ठाणे : ठाणे महापालिकेची निवडणुक येत्या काही महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात असून राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने प्रारुप प्रभाग रचना करण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या म्हणजेच २०१७ प्रमाणेच यंदाच्या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना करण्यात येत आहे. यंदा जनगणना झालेली नसल्यामुळे २०११ च्या जणगणनेच्या आधारे हि प्रभाग रचना करण्यात येत असल्याने नगरसेवक संख्येत वाढ होणार नाही. पण, मतदार संख्या मात्र वाढणार आहे.

ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत ६ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली. तेव्हापासून ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे. यानंतर पालिकेने निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना तयार केली होती. मात्र, राजकीय पक्षांनी घेतलेल्या आक्षेपामुळे ती वादात सापडली होती. तीन सदस्यांचा एक प्रभाग याप्रमाणे ही रचना होती आणि या रचनेनुसार पालिकेने प्रभाग आरक्षण प्रक्रीयाही पार पाडली होती. परंतु महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून पाय उतार होऊन महायुतीचे सरकार सत्तेवर आले. त्यानंतर महायुतीने हि रचना रद्द केली होती. परंतु त्यानंतर निवडणुका झाल्या नाहीत. दरम्यान, लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यातच ठाणे पालिकेची निवडणुक होईल, असे अंदाज वर्तविले जात होते. परंतु अद्यापही पालिकेची निवडणुक जाहीर झालेली नाही. असे असतानाच, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने प्रारुप प्रभाग रचना करण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे दिवाळीनंतरच पालिका निवडणुका होतील, असे अंदाज वर्तविले जात आहेत.

तीन सदस्य प्रभाग रचना रद्द

ठाणे महापालिकेची निवडणूक २०११ सालच्या जणगणनेनुसार होणार आहे. यानुसार शहराची लोकसंख्या १८ लाख ४१ हजार ४८८ इतकी आहे. या लोकसंख्येनुसार एकूण ४७ प्रभाग तयार करण्यात आले होते. त्यापैकी ४६ प्रभाग तीन सदस्यांचा तर एक प्रभाग चार सदस्यांचा होता. या प्रभागांमधून एकूण १४२ नगरसेवक निवडून जाणार होते. त्यापैकी ५० टक्के म्हणजेच ७१ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. परंतु ही रचनाच यापुर्वी रद्द करण्यात आली होती.

चार सदस्यांचा एक प्रभाग याप्रमाणे नवीन प्रभाग रचना

राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने प्रारुप प्रभाग रचना करण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली आहे. यात विविध विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही समिती प्रभाग रचना तयार करण्याचे काम करीत आहे. गेल्या म्हणजेच २०१७ साली झालेल्या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना होती. त्यात ३२ प्रभाग चार सदस्यांचे तर, एक प्रभाग तीन सदस्यांचा होता. अशी एकूण ३३ प्रभागातून १३१ नगरसेवक निवडुण आले होते. यंदाच्या निवडणुकीत अशीच रचना असल्यामुळे प्रभाग आणि नगरसेवक संख्येत वाढ होणार नाही, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नगरसेवक संख्येत वाढ का होणार नाही

दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. परंतु करोनामुळे यंदा जनगणना होऊ शकली नाही. त्यामुळे २०११ च्या जणगणनेनुसार प्रभागांची रचना केली जाणार आहे. ४५ ते ५५ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग असणार आहे. २०११ च्या जणगणनेनुसार शहराची लोकसंख्या १८ लाख ४१ हजार ४८८ इतकी आहे. तर, २०१७ साली झालेल्या निवडणुकीत मतदारांची संख्या १३ लाख ९० हजार ९७३ इतकी होती. या मतदार संख्येत गेल्या काही वर्षात वाढ झाली आहे. त्यामुळे २०११ च्या जणगणनेनुसार प्रभाग रचना तयार केली जाणार असल्याने नगरसेवक संख्येत वाढ होणार आहे.

या मतदारांना मिळणार मतदानाची संधी

नव्या प्रभाग रचनेत २०१७ प्रमाणेच नगरसेवक संख्या १३१ इतकीच राहणार आहे. त्यात वाढ होणार नाही. परंतु या निवडणुकीसाठी आतापर्यंत नोंद झालेल्या मतदारांना मतदारांची संधी मिळणार आहे. त्यामुळे मतदार संख्येत मात्र वाढ होणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.