ठाणे : महापालिका क्षेत्रात नालेसफाईची कामे ४० टक्के झाल्याचा दावा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी पाहाणी दौऱ्यानंतर केला असतानाच, काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र काही ठिकाणी नालेसफाईच्या कामांना सुरुवात झालेली नसल्याचा दावा केला आहे. यामुळे नालेसफाईच्या कामांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तसेच महापालिका अधिकारी आयुक्तांची दिशाभूल करीत असून आयुक्तांनी स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन दौरा करावा अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे.
ठाणे शहरातील सुमारे ५० फूट रूंद असलेल्या आणि मोठ्या प्रमाणात शहरातील पाणी वाहून नेणाऱ्या केव्हिला परिसरातील नालेसफाईला अद्याप सुरूवात झालेली नाही, असा आऱोप ठाणे काँग्रेस प्रवक्ते सचिन शिंदे यांनी केला आहे. दोनच दिवसापूर्वीच या परिसरात आयुक्तांचा दौरा झाला होता. त्यावेळेस ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी या नाल्याची पाहणी का केली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना अधिकारी नियोजित जागीच घेऊन जातात आणि सर्वत्र व्यवस्थित काम चालू असल्याचे भासवून आयुक्तांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही त्यांनी केला आहे. आयुक्तही अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून आपला दौरा पार पाडतात. त्यामुळे खरी परिस्थिती आयुक्तांसमोर येतच नाही. आयुक्तांचे दौरे हे अधिकारी निश्चित करतात. पण ज्या ठिकाणी आयुक्त जाणे गरजेचे आहे, तेथे त्यांना नेले जात नाही. त्यामुळे आयुक्तांनी सुद्धा यापूढे कोणत्याही कामाची पाहणी करताना ज्या भागाचा दौरा करणार आहेत, त्या भागातील स्थानिक नागरिकांना या दौऱ्याची पूर्वसूचना देऊन त्यांच्यासोबत दौरा करावा. त्यावेळेस खरी वस्तुस्थिती समोर येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane municipal corporation officials commissioner congress accused non cleansing works amy
First published on: 12-05-2022 at 17:37 IST