ठाणे : ठाणे महापालिकेतील उपशिक्षक, लिपीक, वरिष्ठ लिपीक, अग्निशमन प्रणेता अशा एकूण १५८ कर्मचाऱ्यांना प्रशासनाने काही दिवसांपुर्वी पदोन्नती दिली असून त्यापाठोपाठ आता वारसा हक्काने ठाणे महापालिकेच्या सेवेत नियुक्त झालेल्या १५५ सफाई कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या नियुक्ती आदेश पालिकेने काढल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

लाड-पागे समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने जे सफाई कर्मचारी सेवानिवृत्त किंवा स्वेच्छानिवृत्त होतात त्यांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत नियुक्ती देण्यात येते. अशी नियुक्ती देण्यात आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांची तीन वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर त्यांना महापालिकेच्या सेवेत कायम केले जाते. मात्र, याबाबत पालिकेने निर्णय घेतलेला नव्हता. त्यामुळे सेवेत कायम करण्याच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत कर्मचारी होते. दरम्यान, काही दिवसांपुर्वी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रूक्कानसिंग डागोर यांनी आज ठाणे महापालिकेस भेट देवून महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन, मूलभूत सुविधा तसेच इतर बाबींचा सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांसाठी चेंजिंग रूम, वैद्यकीय सुविधा, पी एफ, नवीन भरती प्रक्रिया तसेच लाड-पागे धोरणानुसार वारसा हक्काची प्रकरणे तातडीने मार्गी लावावीत, असे निर्देश पालिकेला दिले होते. यानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार आस्थापना विभागाने विशेष मोहिम राबवली.

या मोहिमेत सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केल्यावर १५५ सफाई कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे आदेश टप्प्याटप्याने निर्गमित करण्यात आले. सफाई कामगारांना देय असलेले सर्व लाभ तत्काळ देण्याचे निर्देशही आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. महापालिका सेवेत कायम करण्याचा निर्णय झाल्याने या सफाई कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच, त्याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे महानगरपालिकेच्या सेवेतील ३८ उपशिक्षकांना (प्राथमिक विभाग, मराठी माध्यम) मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यात आली होती. तर, ५४ वरिष्ठ लिपिकांना कार्यालयीन उपअधिक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच ४९ कर्मचाऱ्यांना लिपीक पदावर पदोन्नती देण्यात आली होती. त्यापाठोपाठ अग्निशमन प्रणेता (लिडिंग फायरमन) या पदावर १९ जणांना, तर सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर २ जणांना पदोन्नती देण्यात आली होती. एकूण १५८ जणांना पदोन्नती देण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता वारसा हक्काने ठाणे महापालिकेच्या सेवेत नियुक्त झालेल्या १५५ सफाई कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.