पालकमंत्र्यांचा मुदतवाढीचा आग्रह मुख्यमंत्र्यांकडून मान्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जयेश सामंत, ठाणे

भाजपतील स्थानिक नेत्यांशी सातत्याने खटके उडूनही मुख्यमंत्र्यांच्या वरदहस्तामुळे ठाणे महापालिकेत गेली चार वर्षे आयुक्तपदी विराजमान असलेले संजीव जयस्वाल यांना आणखी एक वर्ष मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे राज्यातील शिवसेना आणि भाजपमधील ‘मैत्रीपर्वा’ची चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गळ्यातील ताईत मानले जाणारे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जयस्वाल यांच्यात गेल्या वर्षभरापासून उत्तम संवाद निर्माण झाला आहे. शहरातील समूह विकास योजना मार्गी लावण्यासाठी भाजपपेक्षाही शिवसेनेला जयस्वाल ठाण्यात हवे आहेत. या पाश्र्वभूमीवर त्यांना आयुक्त म्हणून ठाण्यात पाच वर्षे पूर्ण करण्याची संधी निर्माण करून मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेत्यांना चुचकारल्याची चर्चा आहे. त्यामुळे महापालिकेतील जयस्वाल प्रेमी नगरसेवकांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत.

ठाणे महापालिका आयुक्त म्हणून जयस्वाल यांचा चार वर्षांचा कार्यकाळ जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात पूर्ण झाला आहे. शहरात अनेक विकासकामे सुरू असल्यामुळे लोकसभा निवडणुकांपूर्वी जयस्वाल यांची बदली केली जाईल, अशी चर्चा मध्यंतरी सुरू झाली होती. बेकायदा बांधकामांविरोधात केलेली धडक कारवाई आणि रस्ते रुंदीकरणासाठी आखलेल्या विविध योजना यामुळे शहरात लोकप्रिय झालेले जयस्वाल यांची कार्यपद्धती गेल्या काही वर्षांत सातत्याने वादात सापडली आहे.

सुरुवातीच्या काळात शिवसेनेशी सूर न जुळलेल्या जयस्वाल यांचा मध्यंतरीच्या काळात भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशीही विसंवाद दिसून आला. महापौर मीनाक्षी िशदे यांनी तर अनेकदा जयस्वाल यांचा कारभार एककल्ली असल्याची टीका केली आहे. गेल्या वर्षभरापासून जयस्वाल यांनी शिवसेनेचे ठाण्यातील सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांच्यासह संघर्षांचा आव आणत मुंब्य्रात फुशारकी मारणाऱ्या नेत्यांशी जुळवून घेण्यास सुरुवात केली आहे. भाजप नगरसेवकांच्या एका मोठय़ा गटालाही पंखाखाली घेतले आहे. शहरात माहिती अधिकाराच्या माध्यमातून महापालिकेवर दबाव निर्माण करू पाहणाऱ्या काही वादग्रस्त कार्यकर्त्यांच्या मुसक्याही आवळण्यात आल्या आहेत. त्यामुळे जयस्वाल यांनी प्रशासकीय वर्तुळात एकहाती सत्ता प्रस्थापित केल्याचे बोलले जाते.

शिवसेना नेत्यांची मर्जी पथ्यावर?

ठाणे शहरात समूह विकास योजनेची आखणी करण्यात आली असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत जयस्वाल ठाण्यात हवे आहेत. पालकमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या किसननगर, वागळे परिसरात समूह विकासाचे मोठे प्रकल्प उभे राहणार असून जयस्वाल यांच्याशिवाय ते मार्गी लागणे कठीण आहे, असे शिवसेनेच्या गोटात बोलले जाते. त्यामुळे जयस्वाल यांच्या मुदतवाढीसाठी िशदे कमालीचे आग्रही होते. जयस्वाल यांनीही राजकीय वारे ओळखून पालकमंत्र्यांशी जुळवून घेतले असून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याही ते निकट गेल्याचे वारंवार दिसले आहे. या पाश्र्वभूमीवर भाजप-शिवसेनेतील संवाद यात्रेचे जयस्वाल मानकरी ठरल्याची चर्चा आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane municipal corporation sanjeev jaiswal gets another one year extension
First published on: 31-01-2019 at 02:11 IST