ठाणे : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली पदोन्नती मिळाल्यानंतरही त्या पदाचा पदभार देण्यात आला नसल्यामुळे ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत होता. अखेर ठाणे महापालिका प्रशासनाने पदोन्नती झालेल्या १०५ जणांची इतर विभागात बदली करत त्यांच्याकडे पदभार दिला आहे. काही जणांनी पदभार स्विकारला तर, काही कर्मचारी इतर विभागात जाण्यास तयार नाहीत. या कर्मचाऱ्यांनी आता बदली रोखण्यासाठी राजकीय नेत्यांकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे.
ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील अनेक अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले आहेत. यामुळे ठाणे महापालिकेत अनेक पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळालेली नव्हती. अनेक कर्मचारी पदोन्नती विनाच सेवा निवृत्त झाले आहेत. त्यामुळे पालिकेत कार्यरत असलेले कर्मचारी पदोन्नती केव्हा मिळेल, याची वाट पाहात होते. या पदोन्नतीबाबत निर्णय घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. तसेच काही पदोन्नत्तींबाबत शासनाकडून सुस्पष्ट आदेश प्राप्त झाले होते. त्यामुळे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांच्या पदोन्नत्ती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश आस्थापना विभागाला दिले होते. त्यानुसार, ठाणे महानगरपालिकेच्या सेवेतील ३८ उपशिक्षकांना (प्राथमिक विभाग, मराठी माध्यम) मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यात आली होती. तर, ५६ वरिष्ठ लिपिकांना कार्यालयीन उपअधिक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच ४९ कर्मचाऱ्यांना लिपीक पदावर पदोन्नती देण्यात आली होती.
पदोन्नती मिळूनही होती नाराजी
गेल्या अनेक वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतिक्षेत असलेल्या ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील १०५ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण होते. मात्र, १५ दिवस उलटूनही ५६ कार्यालयीन उप अधिक्षक आणि ४९ लिपीकांना अद्यापही बढतीच्या पदाचा कार्यभार देण्यात आलेला नाही. त्यामुळे जुन्याच पदाचा कार्यभार त्यांना सांभाळावा लागत असल्याने त्यांच्या आनंदावर काहीसे विरजण पडले आहे. याबाबत कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत होता.
अखेर नियुक्ती पण, राजकीय नेत्यांकडे धाव
ठाणे महापालिका प्रशासनाने पदोन्नती झालेल्या १०५ जणांची इतर विभागात बदली करत त्यांच्याकडे पदभार दिला आहे. काही जणांनी पदभार स्विकारला तर, काही कर्मचारी इतर विभागात जाण्यास तयार नाहीत. या कर्मचाऱ्यांनी आता बदली रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. हे कर्मचारी पदभार मिळालेल्या नवीन विभागात काम करण्यासाठी उत्सूक नसल्याचे समजते. यातूनच त्यांनी बदली रोखण्यासाठी राजकीय नेत्यांकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे.
पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे पदस्थापना करता येणे शक्य नव्हते. परंतु या तांत्रिक अडचणी आता दूर करण्यात आल्या असून यानंतर पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांची पदस्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेचे उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी दिली.