thane Municipal Corporation : ठाणे : ठाणे महापालिका आस्थापनेवरील गट-‘क’ व गट-‘ड’मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा आदी सेवांमधील एकूण १७७३ पदे भरली जाणार आहेत. यासाठी आज, मंगळवारपासून म्हणजेच १२ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत उमेदवारांना ऑनलाईनद्वारे अर्ज करता येणार आहेत.
ठाणे महापालिकेची स्थापना १९८२ मध्ये झाली असून ही ‘ब’ वर्ग महापालिका आहे. ठाणे महापालिकेत शिक्षण मंडळासह ९०८८ तर परिवहन सेवेत २ हजार ६०० कर्मचारी आहेत. तसेच २५०० कंत्राटी कामगार आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार ठाणे महापालिकेची लोकसंख्या १८ लाख ४१ हजार इतकी आहे. ही लोकसंख्या आता २६ लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या काही वर्षात पालिका क्षेत्राचे विस्तारीकरण झाले आहे. या क्षेत्रात घोडबंदर सारखा परिसर नवे ठाणे म्हणून उदयास आला आहे. एकीकडे शहराचे नागरीकरण वाढत असून या नागरिकांना मूलभूत सेवासुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने आकृतीबंधमध्ये ८८० वाढीव पदांना मंजुरी दिली. पण, ही भरती काही कारणास्तव होऊ शकलेली नव्हती. त्यातच अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सेवानिवृत्त झाले आहेत. यामुळेच पालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यानेच सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा दुहेरी ताण वाढला होता. दरम्यान, ठाणे महापालिकेने आता रिक्त पदांकरीता भरती प्रक्रीया राबविण्याचा निर्णय घेतला असून यानुसार, सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन आणि आरोग्य विभागात एकूण १७७३ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार या भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले आहे. भरती प्रक्रियेत तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. त्यामुळे या पदभरतीबाबतची जाहिरात प्रसारमाध्यमांमधूनही प्रकाशित करण्यात आलेली आहे.
परीक्षा शुल्क भरावे लागणार
अमागास प्रवर्गासाठी रुपये १००० एवढे प्रवेश शुल्क आहे. तर, मागासप्रवर्ग आणि अनाथ प्रवर्गासाठी ९०० रुपये एवढे परीक्षा शुल्क आहे. माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी शुल्क माफ आहे. अर्ज व परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पध्दतीनेच भरणे आवश्यक आहे. उमेदवारास प्रसिध्द केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरीता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करुन त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील. परीक्षा शुल्क ना-परतावा आहे. ऑनलाईन शुल्क भरताना बँकेचे इतर शुल्क उमेदवाराला स्वत: भरावे लागेल. कोणत्याही कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगित किंवा रद्द झाल्यास उमेदवारास परीक्षा शुल्क परत करण्यात येणार नाही. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क २ सप्टेंबर, २०२५ पर्यंत भरता येईल. तसेच, परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र परीक्षेच्या सात दिवसआधी उपलब्ध होईल. प्रवेश पत्रात ऑनलाईन परीक्षेचा दिनांक नमूद करण्यात येईल. ही माहिती ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात येईल. परीक्षेचा दिनांक, वेळ, केंद्र इत्यादी बाबी प्रवेशपत्रामध्ये नमूद केल्या जाणार आहेत. तसेच, या भरतीच्या कार्यक्रमातील संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती प्रसिध्द करण्यात येणार आहे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
तपशील महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत, तपशिल तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी. तसेच, संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशील, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, वयोमर्यादा शिथिलता, निवड पध्दत, सर्वसाधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादीबाबतचा तपशिल ठाणे महानगरपालिकेच्या http://www.thanecity.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. तसेच जाहिरातीमधील बाबींसंबंधी विचारणा करण्यासाठी ०२२-२५४१५४९९ हा हेल्पलाईन क्रमांक कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सोमवार ते शुक्रवार सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत सुरू राहील. त्याचप्रमाणे, tmcrecruitment2025@gmail.com येथे इमेलही करता येईल. त्याचबरोबर, अर्ज भरणे, परीक्षा शुल्क तसेच प्रवेशपत्र याबाबत काही तांत्रिक समस्या उद्भवल्यास महापालिकेने ०२२-६१०८७५२० हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.
या पदांसाठी होणार भरती
सहायक परवाना निरीक्षक, लिपीक तथा टंकलेखक, लिपीक लेखा, कनिष्ठ अभियंता १ (नागरी), कनिष्ठ अभियंता १ (यांत्रिकी / ऑटो), कनिष्ठ अभियंता १ (विद्युत), कनिष्ठ अभियंता २, प्रदूषण निरीक्षक, सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी, चालक-यंत्रचालक, फायरमन, वाचा उपचारतज्ज्ञ (जिद्द शाळा), मानसोपचार तज्ज्ञ (जिद्द शाळा), परिचारिका (जिद्द शाळा), विशेष शिक्षक (अस्थि व्यंग), स्वच्छता निरीक्षक, डायटिशियन, बायोमेडिकल इंजिनिअर, फिजिओथेरपिस्ट, सायकॅट्रीक कौन्सिलर, पब्लिक हेल्थ नर्स (पी.एच.एन.), वैद्यकीय समाजसेवक, क्ष-किरण तंत्रज्ञ, नर्स मिडवाईफ, परिचारीका, स्टाफ नर्स, मेमोग्राफी टेक्निशियन, एन्डोस्कोपी टेक्निशियन, ऑडी ओमेट्री टेक्निशियन, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, सी.टी. स्कॅन तंत्रज्ञ, एम. एन. तंत्रज्ञ, अल्ट्रा सोनोग्राफी, सी.टी.स्कॅन तंत्रज्ञ, ई.सी.जी. टेक्निशियन, ब्लडबॅंक टेक्निकल सुपरवायझर, ब्लडबॅंक टेक्निशियन, स्पिच थेरेपिस्ट, चाईल्ड सायकोलॉजिस्ट, प्रोस्टेटिक व ऑर्थोटिक टेक्निशियन, ई.ई.जी.टेक्निशियन, मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर, फिजिसिस्ट, क्युरेटर ऑफ म्युझियम, औषधनिर्माण अधिकारी, ऑक्यूपेशनलथेरपिस्ट, पलमोनरी लॅब टेक्निशियन, ऑपथॅलमिक असिस्टंट, डेप्युटी लायब्रेरियन, लायब्ररी असिस्टंट, आर्टिस्ट, सहायक ग्रंथपाल, सहायक क्ष-किरण तंत्रज्ञ, मल्टीपर्पजवर्कर (बहुउद्देशीय कामगार), स्टॅटिस्टीशियन. ऑडिओव्हिज्युअलटेक्निशियन, सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, मेडिकल रेकॉर्ड किपर, प्रसाविका, ज्युनियर टेक्निशियन, लेप्रसी असिस्टंट, शस्त्रक्रिया सहायक, वॉर्ड बॉय, दवाखाना आया, लॅबोरेटरी अटेंडन्ट, पोस्टमार्टम अटेंडन्ट, मॉरच्युरी अटेंडन्ट, अटेंडन्ट, बार्बर अशा एकूण १७७३ पदांसाठी भरती होणार आहे.