प्राप्तिकर प्रक्रियेमुळे पगारास विलंब होत असल्याचा प्रशासनाचा दावा

लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे : करोना संकटाच्या काळात उत्पन्न वसुलीवर परिणाम झाल्यानंतरही अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेळेवर म्हणजेच प्रत्येक महिन्याला ३०, ३१ किंवा १ तारखेला वेतन देणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाने मार्च महिन्यात मात्र ३ तारखेपर्यंत वेतन देऊ केलेले नाही. वेतनास विलंब झाल्यामुळे अनेकांच्या कर्जाच्या हप्त्यांची तारीख चुकली असून त्यांना आता दंडाचा भरुदड सोसावा लागणार आहे. दरम्यान, प्राप्तिकर कापून घेण्याच्या प्रक्रियेमुळे वेतन देण्यास विलंब होत असल्याचे सांगत येत्या दोन दिवसांत वेतन दिले जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

ठाणे महापालिका आस्थापनेवर ७ हजार ९१ अधिकारी-कर्मचारी तसेच मानधनावरील २६२ कर्मचारी, शिक्षण विभागात १ हजार ४७ कर्मचारी आहेत. करोना संकटाच्या काळात पालिकेच्या विविध विभागांच्या उत्पन्न वसुलीवर परिणाम झाला आहे. असे असतानाही या काळात पालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांना वेळेवर म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या ३०, ३१ किंवा १ तारखेला वेतन दिले. तर गृह तसेच वैयक्तिक कर्जाचे हप्ते भरण्यासाठी बँकेने अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याची २ तारीख ठरवून दिली आहे. मात्र मार्च महिन्यात ३ तारीख उलटून गेली तरी अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेतन मिळू शकलेले नाही.

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पगारातून प्राप्तिकर कापून घेण्याचे काम करण्यात येत असून या प्रक्रियेमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनास विलंब झाला आहे. मात्र ही प्रक्रिया पूर्ण होत आल्यामुळे येत्या दोन दिवसांत अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन मिळेल.

– संदीप माळवी, उपायुक्त, महापालिका