scorecardresearch

ठाणे : खड्ड्यामुळे आणखी एकाचा बळी; जिल्ह्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू

खड्ड्यामुळे दुचाकीचा वेग कमी केल्याने मागून येणाऱ्या ट्रकने उडवले

ठाणे : खड्ड्यामुळे आणखी एकाचा बळी; जिल्ह्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू
(संग्रहित छायाचित्र)

भिवंडी येथील नदीनाका भागात खड्ड्यामुळे आणखी एकाचा बळी गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशोक काबाडी (६५) असे मृताचे नाव असून खड्ड्यामुळे दुचाकीचा वेग कमी केल्याने मागून येणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेमुळे हा अपघात झाला आहे.

याप्रकरणी निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

भिवंडीतील आनगाव भागात अशोक काबाडी राहत होते. रविवारी सायंकाळी ते मुलगी आदिती (२५) हिच्यासोबत वंजारपट्टीच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. त्यांची दुचाकी नदीनाका येथील पूलावर आली असता, पूलावर खड्डे पडले होते. त्यामुळे दुचाकी चालवित असलेल्या आदितीने दुचाकीचा वेग कमी केला. त्याचवेळी मागून येणाऱ्या एका ट्रकची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. या धडकेमुळे दोघेही दुचाकीवरून खाली पडले. अशोक यांच्या पोट आणि छातीवरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी आदिती हिने दिलेल्या तक्रारीच्या आधारे निजामपुरा पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या