TMT, Thane :ठाणे : ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाच्या (टीएमटी) गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतू, अनेकदा काही प्रवासी विना तिकीट प्रवास करतात. अशा प्रवाशांवर ठाणे महापालिका परिवहन विभागाच्यामार्फत वारंवार कारवाई केली जात आहे. परंतू, असे असतानाही विना तिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत घट होताना दिसत नाही आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवघ्या सात दिवसांच्या कालावधील १०० ते २०० प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळून आले असून त्यांच्याकडून १९ हजार १६९ रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

ठाणे शहरातील विविध मार्गांसह मुलुंड, बोरिवली, मिरा-भाईंदर अशा काही शहरांमध्ये टीएमटी गाड्या धावतात. या टीएमटी गाडीचे प्रत्येक मार्गाच्या अंतरानुसार तिकीट दर ठरविले आहेत. शहराच्या विविध भागातील अंतर्गत मार्गावरून ते ठाणे स्थानपर्यंत तसेच मुलुंड स्थानक पर्यंत सर्वाधिक फेऱ्या टीएमटी गाड्यांच्या होतात. त्यामुळे सकाळ तसेच संध्याकाळच्या वेळी नोकरदार वर्ग तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी गर्दी बसमध्ये असते. या गर्दीचा गैरफायदा घेत काही प्रवासी वाहकाची नजर चूकवून तिकीट काढत नाही. गेल्या वर्षेभरात विना तिकीट प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे या विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी शहरातील काही मुख्या थांब्यांवर तिकीट तपासणीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच अनेकदा हे तिकीट तपासणीस बस मध्येही प्रवाशांनी तिकीट काढली आहे की नाही हे तपासण्यासाठी येतात.

एखादा प्रवासी विना तिकीट प्रवास करत असल्याचे आढळून येताच. त्याच्या दंडात्मक कारवाई केली जाते. प्रवासी भाडेदरासह २०० रुपये दंड आकारला जातो. गेले एक दीड वर्षे वारंवार विना तिकीट प्रवाशांवर कारवाई केली जात असतानाही विना तिकीट प्रवाशांच्या संख्येत घट होताना दिसून येत नाही आहे. ऑगस्ट महिन्यात ६०० ते ७०० प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्या कडून १ लाख २७ हजार ५३२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर, सप्टेंबर महिन्यात देखील पहिल्या आठवड्यात जवळपास १०० ते २०० प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १९ हजार १६९ दंड वसूल करण्यात आला आसल्याची माहिती ठाणे परिवहन विभागाकडून देण्यात आली.

सप्टेंबर पहिला आठवडा कारवाई

दिवसदंड वसूल
०१ सप्टेंबर २०२५१०५०
०२ सप्टेंबर २०२५ २५१५
०३ सप्टेंबर २०२५१८८८
०४ सप्टेंबर २०२५४६०२
०५ सप्टेंबर २०२५२३१०
०६ सप्टेंबर २०२५ ५३३९
०७ सप्टेंबर २०२५ १४६५
एकूण १९,१६९