ठाणे : व्यवसायिक किंवा नोकरदार शक्यतो कामानिमित्ताने विमानाने मुंबईमध्ये प्रवास करत असतात. परंतु आसाममध्ये राहणारा मोईनुल इस्लाम हा चोरटा चोरीच्या उद्देशाने थेट आसाममधून मुंबईत प्रवास करत असे. गेल्या दोन वर्षांपासून तो चोरी करून पुन्हा विमानाने आसाम किंवा नागालँडमध्ये परतत होता. पोलिसांपासून बचावासाठी तो मोबाईल वापरणे टाळत होता. तसेच डोक्यावर विग घालून वावरत होता. अखेर ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आसामध्ये जाऊन वेशांतर करत त्याला ताब्यात घेतले. त्याच्या अटकेमुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे आयुक्तालयात दाखल असलेल्या २२ गुन्ह्यांची उकल झाली आहे. तसेच त्याच्याकडून ६२ लाख २४ हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

ठाणे आयुक्तालय क्षेत्रात घरफोडी आणि चोरींच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. त्यामुळे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सर्व अधिकाऱ्यांना गुन्हे उघडकीस करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या भिवंडी कक्षामार्फत शोध सुरू झाला. साहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार, पोलीस हवालदार अमोल देसाई, पोलीस नाईक सचिन जाधव, पोलीस शिपाई भावेश घरत आणि अमोल इंगेळ यांचे विशेष पथक स्थापन केले.

हेही वाचा…उमेदवारी जाहीर झालेली नसतानाही संजीव नाईक यांचा प्रचार सुरू, शिवसेनेमध्ये अस्वस्थता

भिवंडीतील नारपोली येथे एका घरफोडीच्या प्रकरणाचा तपास पथकाकडून सुरू होता. त्यावेळी यातील आरोपी मोईनुल हा आसाम किंवा नागालँडमध्ये वास्तव्यास असून तो चोरी करण्यासाठी विमानाने मुंबईत येतो. चोरी झाल्यानंतर तो पुन्हा आसाम किंवा नागालँड येथे विमानाने जातो अशी माहिती खबऱ्यांनी दिली. तसेच तो मोबाईल देखील वापरत नव्हता. त्यामुळे त्याला आसाममध्ये जाऊन अटक करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. पोलिसांचे पथक आसाममध्ये गेले. येथील सामरोली गावाजवळील नदी किनारी तो वास्तव्यास असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यामुळे पोलिसांनी नदीच्या दुसऱ्या टोकाला वेशांतर करून राहण्याचा निर्णय घेतला.

नदीमध्ये पोहण्याच्या बहाण्याने, गावात फेरफटका मारण्याच्या बहाण्याने पोलीस त्याच्या घराजवळ तपासासाठी जाऊ लागले. परंतु तो घरात येत नव्हता. त्यानंतर खबऱ्यामार्फत पथकाने माहिती घेतली असता, तो रमजान निमित्ताने सायंकाळी त्याच्या घरी येणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आसाम पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबूली दिली. त्याच्या अटकेमुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील २२ गुन्हे उघडकीस आले आहेत.

हेही वाचा…मनसेचे राजू पाटील म्हणतात, जगातील दहावे आश्चर्य डोंबिवलीत

मोईनुल इस्लाम हा पूर्वी नवी मुंबई येथे वास्तव्यास होता. तेथील एका उपाहारगृहात तो काम करत होता. २०२२ मध्ये त्याला एका चोरीच्या प्रकरणात नवी मुंबई येथील कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. तिथे त्याची इतर चोरट्यांसोबत ओळख झाली. त्यांच्यासोबत राहून त्याला या चोरीच्या वाईट कल्पना सूचल्या. जामीनावर सुटल्यानंतर तो चोऱ्या करू लागला होता. दोन वर्षांपासून तो चोरी करून पुन्हा विमानाने त्याच्या आसाम किंवा नागालँडमध्ये परतत होता. पोलिसांपासून बचावासाठी तो मोबाईल वापरणे टाळत होता. तसेच डोक्यावर विग घालून वावरत होता.