एखादा गुन्हा करताना गुन्हेगार जितकी सावधगिरी बाळगतात, तितकीच पोलिसांनी पकडू नये म्हणून खबरदारी घेतात. समाधान बनसोडे यानेही खंडणीच्या गुन्हय़ात अशीच पुरेपूर काळजी घेतली आणि या गुन्हय़ात स्वत:च्याच नातलगाला अडकविण्याचा बेतही आखला. त्याने ठरविल्याप्रमाणे तसे घडतही होते. यामुळे पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते आणि सातत्याने तपासाची दिशा भरकटत होती. अखेर या गुन्हय़ाचा सविस्तर अभ्यास करताना पोलिसांना एक धागा मिळाला आणि त्याआधारे तो पोलिसांच्या जाळ्यात सहजपणे अडकला..
अहमदनगर जिल्हय़ातील समाधान बनसोडे याने दीड महिन्यापूर्वी मुंबापुरी गाठली. जेमतेम २१ वर्षांचा हा तरुण. अनेकांप्रमाणेच तोही नवे स्वप्न घेऊन आला होता. बक्कळ पैसा कमविणे असे त्याचे स्वप्न होते. मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबई भागांत त्याचे बरेचसे नातेवाईक वास्तव्यास आहेत. तो त्यांच्याकडेच राहायचा; पण कामधंदा करीत नव्हता. त्यामुळे नातेवाईकही त्याला फार दिवस ठेवत नव्हते. त्यामुळे तो सतत नातेवाईकांची घरे बदलत होता. तसेच खिशात पैसे नसल्याने दैनंदिन खर्च भागविण्यासाठी उसनवारी पैसे घेऊ लागला. बघता-बघता या उसनवारी पैशांचा आकडा सवा लाखांच्या घरात गेला.

हे उसनवारी कर्ज फेडायचे कसे, याची चिंता त्याला सतावू लागली आणि तो झटपट पैसे कमविण्याचा मार्ग शोधू लागला. त्यातूनच त्याच्या डोक्यात खंडणीची कल्पना आली आणि त्यासाठी त्याने खंडणीची योजना आखली. दीड ते दोन वर्षांपूर्वी तो नाशिक जिल्हय़ातील एका हॉटेलमध्ये काम करायचा. या हॉटेलमालकाची आर्थिक परिस्थिती उत्तम होती, याविषयी त्याला चांगली माहिती होती. तसेच त्याच्या कुटुंबाविषयी त्याला बरीचशी माहिती होती. या मालकाने काही महिन्यांपूर्वी दुसऱ्या व्यक्तीला हॉटेल चालविण्यास दिले. त्यानंतर समाधान यानेही ही नोकरी सोडून दिली. मात्र, त्याच्याकडे मालकाचा मोबाइल क्रमांक होता. तसेच सध्या तो चित्रपट निर्मिती क्षेत्रात कार्यरत असल्याचेही त्याला ठाऊक होते. त्यामुळे त्याने खंडणीसाठी मालकाची निवड केली आणि त्याच्याकडून एक कोटीची खंडणी वसूल करण्याचे बेत आखले. खंडणीचे पैसे घेताना मालकाने आपल्या ओळखू नये म्हणून त्याने एक निर्जनस्थळ निवडले होते. या ठिकाणी सात ते आठ तास कुणी फिरत नाही, असे हे ठिकाण होते. त्या ठिकाणी तो मालकाला पैसे ठेवण्यास सांगणार होता आणि काही तासांनंतर ते पैसे घेऊन जाणार होता, असा त्याचा बेत होता.

त्या वेळी तो घाटकोपर भागात राहायचा. तसेच हा गुन्हा केल्यानंतर पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील, याची त्याला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे पोलिसांनी आपला माग काढू नये म्हणून त्याने एक शक्कल लढविली. बदलापूर भागात त्याची मावसबहीण राहते. त्याचे भाऊजी इलेक्ट्रिशनचे काम करतात. तो त्यांच्या घरी एक दिवस राहण्यासाठी गेला होता. त्याच्या बहिणीच्या मोबाइलमध्ये दोन सिमकार्ड होते. त्यापैकी एक कार्ड त्याने चोरले; परंतु या चोरीविषयी बहिणीला थांगपत्ताही नव्हता. आठ दिवसांनंतर त्याने या क्रमांकावर मालकाला फोन केला आणि एक कोटीच्या खंडणीसाठी धमकाविले. तसेच खंडणीच्या मागणीसाठी त्याने भावोजीचे नाव वापरले. ‘तुमच्या दोन्ही मुलांना मारण्याची सुपारी माझ्याकडे आली आहे, त्यांची सलामती पाहिजे असेल तर एक कोटी रुपये दे’, अशी धमकी दिली होती. यामुळे मालक प्रचंड भेदरला होता आणि त्याने दोन्ही मुलांना घरातून बाहेर पाठविणे बंद केले. पोलिसांत तक्रार करण्याचीही त्याला भीती वाटू लागली. ही धमकी दिल्यानंतर समाधानने मोबाइल बंद केला. तो सार्वजनिक टेलिफोन बूथवरून मालकाला मिसकॉल करायचा. यामुळे मालक आणि त्याचे कुटुंब आणखी भयभीत झाले. अखेर मालकाने पोलिसात तक्रार करायचे ठरविले. ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकाराबाबत माहिती दिली. मालकाने दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या तपासाची कामगिरी ठाणे खंडणीविरोधी पथकावर सोपवली. त्यानुसार पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण, अप्पर पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहायक पोलीस आयुक्त नागेश लोहार यांच्या व वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. टी.कदम आणि पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. समाधान याने धमकीसाठी मावसबहिणीचा मोबाइल क्रमांक वापरला होता. त्यामुळे पोलिसांचे पथक त्याच्या मावसबहिणीच्या घरी पोहोचले आणि चौकशीसाठी पथकाने तिच्या पतीला ताब्यात घेतले. धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि तिच्या पतीचे नाव एकच होते. तसेच धमकीसाठी वापरण्यात आलेला मोबाइलही त्यांच्याच नावे होता; परंतु या प्रकरणात आपला काहीच सहभाग नसून असे काहीच कृत्य केले नसल्याचे तो चौकशीदरम्यान सांगत होता. हे सिमकार्ड समाधानची बहीण वापरत होती, त्यामुळे पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली. त्यामध्ये हे सिमकार्ड काही दिवसांपूर्वी गहाळ झाल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी सिमकार्ड मोबाइलमधून गहाळ केव्हा झाले आणि त्याआधीच्या काही दिवसांचा घटनाक्रम जाणून घेतला. हे मागचे दिवस आठवत असतानाच कार्ड गहाळ झाले, त्याच्या आदल्या दिवशी समाधान घरी आल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्याचा पत्ता त्यांना माहिती नव्हता; पण त्याचा मोबाइल क्रमांक त्यांच्याकडे होता. त्यामुळे त्यांनी त्याला फोन करून बोलावून घेतले; परंतु तो काही आला नाही. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरचा संशय बळावल्याने त्याचा माग काढण्यास सुरुवात केली. अखेर तो ऐरोली भागात नातेवाईकाच्या घरी सापडला. मालकाला धमकावल्यानंतर घाटकोपर सोडून तो ऐरोलीतील नातेवाईकाकडे राहण्यासाठी गेला होता. तेथूनच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि खंडणीच्या माध्यमातून गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल ठेवू पाहणाऱ्या समाधानच्या मुसक्या पहिल्याच प्रयत्नात आवळण्यात आल्या.