जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ठाणे परिसरात विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा दिनक्रम छायाचित्रबद्ध करण्याचा हा एक प्रयत्न. दरवर्षी ८ मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा होत असला, तरी या महिलांच्या दृष्टीने प्रत्येक दिवसच त्यांच्यासाठी खास असतो. कारण घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून त्यांना नोकरी आणि व्यवसायाची कामगिरी पार पाडावी लागते. अगदी अंबरनाथ-बदलापूरमधून दररोज सकाळी महिला उपनगरी गाडय़ांनी मुंबईत नोकरीनिमित्त जातात आणि संध्याकाळी उशिरा परत येतात. त्यावेळी त्यांच्या मनात कुटुंबाचे अनेक प्रश्न असतात. पण कामावर गेल्यानंतर मात्र त्यांच्या ध्यानीमनी फक्त कार्यालयातील जबाबदारीचाच विचार असतो. पुन्हा संध्याकाळी घरी परतताना रात्रीच्या स्वयंपाकाची मनातल्या मनात जुळवाजुळव करून, वाटेत भाज्यांची खरेदी करीत त्या घर गाठतात, तेव्हा एक दिवस संपल्याचे आणि एक युद्ध जिंकल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर असते.
दीपक जोशी
कोपरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.एस.काळबाडे त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करताना..
उल्हासनगर येथील आशा विश्वकर्मा पुरुषांची मक्तेदारी असलेल्या रिक्षा व्यवसायात आहेत. शहरात त्या भाभी नावाने ओळखल्या जातात.
रेल्वेचालक सुरेखा यादव आता कल्याण येथील मोटरमन प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
पॉवर लिफ्टिंग क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय खेळाडू दीपाली कुलकर्णी सध्या उल्हासनगर येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत.
ठाणे रेल्वे स्थानकातील पॉइंट्समन मनीषा पारले.