वाय.सी. एम. बोरिवली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या बास्केटबॉल स्पर्धेत डोंबिवलीच्या विद्या निकेतन शाळेच्या १३ वर्षांखालील मुलींच्या संघाने बोरिवलीच्या विब्योर या शाळेचा पराभव करत विजेतेपद पटकावले. या विजेत्या संघाकडून ऋचा वागशील, ऋतुजा चौधरी, प्रचीती शिर्के, अदिती लांडगे, गौरी दंडवते, यांनी उत्कृष्ट खेळी केली तर ऋचा गाडगीळ हिला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. या विजयी संघाचे शाळेचे संचालक विवेक पंडित, अतुल पंडित व मुख्यध्यापिका गौरी पंडित यांनी कौतुक केले आहे. आनंद फडके यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.

राज्यस्तरीय पुरुष व महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

महाराष्ट्र राज्य व ठाणे जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या सहकार्याने सीनियर राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा २९ ते ३१ जुलैदरम्यान गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी राज्यातून २५ संघांतील सुमारे ३६० खेळाडू सहभागी होणार आहेत. या राज्यस्तरीय स्पर्धेमधून जमशेदपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे.

पूर्वा मॅथ्यू आणि आशुतोष लोकरे यांना कास्य पदक

आंतरराष्ट्रीय कुराश बीच स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी ४८ किलोखालील वजनी गटात डोंबिवली  येथील पूर्वा मॅथ्यू तर ६० किलो वजनी गटात आशुतोष लोकरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावत कास्य पदकावर आपले नाव कोरले आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षिका लीना मॅथ्यू ओक यांनी या दोघांचे अभिनंदन तसेच कौतुक केले.