‘‘मॅरेथॉन स्पर्धामध्ये लहान वयातच मुलांना सहभागी होण्याची संधी मिळत असते. पालकवर्ग त्यासाठी त्यांना प्रोत्साहनही देत असतात. मॅरेथॉन स्पर्धाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात अ‍ॅथलेटिक्सचे महत्त्व निर्माण होऊन त्याकडे मुले वळू शकतील,’’ असे मत थाळीफेकपटू कृष्णा पुनिया यांनी व्यक्त केले. ठाण्यातील ‘आम्ही सारे’ या संस्थेच्या वतीने रविवारी ‘क्रांती दौड’चे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन कार्यक्रमास आलेल्या कृष्णा हिने विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला.
मुलांमध्ये आरोग्य आणि खेळाचे महत्त्व रुजवण्यासाठी मॅरेथॉन हे योग्य माध्यम असून या स्पर्धातील सहभागामुळे मुलांना त्यांची क्षमता ओळखता येईल आणि त्यामुळे या खेळात पुढे जाण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केले जातील. त्यातूनच भविष्यात देशासाठी खेळणारे आणि पदकांची कमाई करणारे युवा खेळाडू मिळू शकतील. आपल्या देशामध्ये पालकांची मानसिकता खूप भिन्न असून ती बदलण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे. एखाद्या खेळामागेच पालक विद्यार्थ्यांना पाठवत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या योग्य कौशल्यांना मुरड बसू शकते. त्यामुळे पालकांनी सगळ्याच खेळांकडे मुलांना पाठवणे गरजेचे आहे. लहान वयातच मुलांनी खेळाचे शास्त्रशुद्ध तंत्र आवगत करण्यास सुरुवात केली तर वयाच्या २० व्या वर्षांपर्यंत ते मूल एक चांगला ‘युवा खेळाडू’ म्हणून देशासाठी खेळताना दिसू शकेल. त्यामुळे त्याचे खेळावरील प्रावीण्य वाढण्यास मदत होऊ शकते.

संकलन : संकेत सबनीस
पेटांक्यूच्या राष्ट्रीय स्पर्धेत ठाण्याचे खेळाडू

हितेंद्र महाजन, विधी पोद्दार, अंशू जग्यासी, सुनिधी गुप्ता यांचा समावेश

प्रतिनिधी, ठाणे</strong>
पेटांक्यू या आंतरराष्ट्रीय खेळाची ऑगस्टमध्ये होणारी राष्ट्रीय स्पर्धा आता सप्टेंबर महिन्यात होणार असून या स्पर्धेत चार ठाणेकर खेळाडूंचा समावेश नुकताच करण्यात आला आहे. जुलै महिन्यादरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव-जामोद या गावी झालेल्या कुमार राज्यस्तरीय स्पर्धेत ठाणे जिल्ह्य़ाच्या मुलांचे व मुलींचे संघ सहभागी झाले होते. यात प्रशिक्षक सुभाष उंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींच्या संघाचे नेतृत्व विधी पोद्दार हिने तर मुलांच्या संघाचे हितेंद्र महाजन याने नेतृत्व केले होते. या स्पर्धेच्या ट्रिपल प्रकारात ठाणे जिल्ह्य़ाने द्वितीय क्रमांक पटकावला होता. या स्पर्धेत करणाऱ्या हितेंद्र महाजन, विधी पोद्दार, अंशू जग्यासी, सुनिधी गुप्ता या ठाण्याच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावर या खेळाडूंची राष्ट्रीय कुमार पेटांक्यू स्पर्धेत नुकतीच निवड घोषित करण्यात आली असून ही स्पर्धा ११ ते १३ सप्टेंबर दरम्यान, अहमदाबाद येथे होणार आहे. अशी माहिती ठाणे पेटांक्यू असोसिएशनचे सुरेश गांधी यांनी दिली.

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा

प्रतिनिधी, बदलापूर
बदलापूरजवळील कान्होर येथे युवाराज प्रतिष्ठान व राजे स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी यांच्या वतीने ‘ठाणे जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा २०१५’चे आयोजन करण्यात आले आहे. १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सकाळी १० वाजल्यापासून ही स्पर्धा कान्होर येथे सुरू होणार आहे. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या १२ संघांना प्रवेश मिळणार असून संघांसाठी प्रवेश फी २५० रुपये आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ३,३३३ रुपये असून द्वितीय पारितोषिक २,२२२ रुपये व तृतीय पारितोषिक १,१११ रुपये आहे, अशी माहिती व्हॉलीबॉलचे प्रशिक्षक यज्ञेश्वर बागराव यांनी दिली.
संपर्क- प्रशांत देशमुख- ९२७०४९०९५५, भूषण कुलकर्णी- ९९२१३२७२९९.