बंद सिग्नल हटवून सेवा रस्त्यांवरून एकेरी वाहतुकीचा विचार
जुन्या आणि नव्या ठाण्याचा मध्यिबदू मानल्या जाणाऱ्या पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी चौकातील वाहतूक कोंडीचा चक्रव्यूह भेदण्यासाठी येथील वाहतूक मार्गात मोठे फेरबदल करण्याचा प्रस्ताव ठाणे वाहतूक विभागाने तयार केला असून येथे सद्य:स्थितीत बंद अवस्थेत असलेल्या सिग्नलच्या संख्येत कपात करून ही यंत्रणा नव्याने कार्यान्वित करण्याचा निर्णय येत्या काही दिवसांत अमलात आणला जाणार आहे. तसेच चौकातील दोन सिग्नल कमी करण्यासाठी महामार्गालगत असलेल्या दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांवर काही भागापर्यंत एकेरी वाहतूक सुरू करता येऊ शकते का, याची चाचपणी वाहतूक पोलिसांनी सुरू केली आहे. येत्या पंधरा दिवसांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबविण्याचा पोलिसांचा मानस आहे.
ठाणे शहर तसेच वागळे परिसरातील वाहतुकीच्या दृष्टिकोनातून नितीन कंपनीचा चौक महत्त्वाचा मानला जातो. मुंबई-नाशिक महामार्गावर असलेल्या या चौकातून वागळे इस्टेट, मुंबई, घोडबंदर आणि ठाणे स्थानकाच्या दिशेने जाणारे चार प्रशस्त रस्ते आहेत. तसेच या मार्गाच्या दोन्ही बाजूंना सेवा रस्तेही आहेत. गेल्या काही वर्षांपासून या चौकामध्ये वाहनांचा भार वाढला आहे. मात्र, त्याचे योग्यप्रकारे नियोजन होत नसल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. ही कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी आता नियोजन सुरू केले आहे.
नितीन कंपनी चौकामध्ये महामार्गावरील चार आणि सेवा रस्त्यांवरील चार असे एकूण आठ रस्ते येऊन मिळतात. या आठही रस्त्यांवर सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली असून या सिग्नलमुळे आठ रस्त्यांवरील वाहतुकीचे नियोजन करणे शक्य होत नाही, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. एका रस्त्यावरील सिग्नल सुरू असेल तर अन्य मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागतात आणि त्यामध्ये नागरिकांना अडकून पडावे लागते. सेवा रस्त्यांवर तर वाहतुकीचा अक्षरश: बोजवारा उडतो. त्यामुळे चौकातील वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे ठेवण्यासाठी आठऐवजी सहा सिग्नल सुरू ठेवण्याचा विचार वाहतूक पोलिसांनी सुरू केला आहे. चौकातील दोन सिग्नल बंद केल्यास महामार्गालगत असलेल्या दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांवर काही भागापर्यंत एकेरी वाहतूक सुरू करता येऊ शकते का, याची चाचपणी वाहतूक पोलिसांनी सुरू केली आहे. येत्या पंधरा दिवसांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा बदल लागू करण्याचा विचार आहे. यामुळे वागळे परिसर तसेच ठाणे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होऊ शकेल, अशी माहिती वाहतूक शाखेच्या वागळे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली.
बदल काय?
- नितीन कंपनी चौकातील बंद सिग्नल सुरू करण्यात येईल. त्यामुळे सिग्नलविना बेशिस्तपणे होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण येईल.
- मुख्य चौक आणि सेवा रस्त्यांवर सद्य:स्थितीत आखण्यात आलेल्या आठपैकी सहा सिग्नल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येकी तीन मिनिटांचा एक सिग्नल असणार आहे.
- दोन सिग्नल कमी केल्याने येथील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊ नये यासाठी महामार्गालगतच्या दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांवर एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे.
- महामार्ग आणि सेवा रस्त्यांच्या मधोमध जोड रस्ते तयार करण्यात आले असून तेथून सेवा रस्त्यावरील वाहनांना महामार्गावर येऊन इच्छितस्थळी जाता येऊ शकेल.