Thane News : ठाण्यातील तुळजाभवानी मंदिर सध्या भक्तांच्या श्रद्धेचे केंद्रबिंदू बनले आहे. देवीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक या मंदिरात गर्दी करत आहेत. परंतू, हे मंदिर केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे तर, सांस्कृतिक आणि पर्यटन दृष्टिकोनातूनही लोकप्रिय ठरत असल्याची बाब समोर आली आहे.

देशातील ५१ शक्तीपीठांपैकी आणि राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पुर्ण शक्तीपीठ म्हणून तुळजापुरचे तुळजाभवानी मंदीर ओळखले जाते. या शक्तीपीठाचे एक रुप ठाण्यात साकारण्यात आले आहे. ठाण्यातील पाचपाखाडी भागात राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हे प्रति तुळजापुर मंदीर उभारले आहे. तमीळनाडूचे सेलम आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील दगडखाणीतून कृष्णशिळा कर्नाटकातील मुरुडेश्वर येथे आणण्यात आल्या होत्या. असेंड एडकाॅमचे संदीप लोट यांच्या सल्ल्यानुसार वास्तुविशारद संजय बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली दानश्री शिल्पकला केंद्राचे मंजुनाथ देवाडिगा यांनी या कृष्णशिळांना आकार दिला. शिखर कलश, नवग्रह, दगडी स्तंभ, आकर्षक कलाकुसर, हत्ती या कृष्णशिळेतून साकारुन ठाण्यात आणण्यात आले. तर, काही शिळांना ठाण्यातच आकार दिला.

लोप पावत असलेल्या हेमाडपंथी शैलीला पुन:र्जिवित करीत हे मंदिर साकारले आहे. पाषाणाव्यतिरिक्त अन्य साधनांचा वापर न करता, हे मंदिर उभारले आहे. या मंदिरातील तुळजाभवानी देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते करण्यात आली होती. या मंदिरात तुळजाभवानी देवीची प्राणप्रतिष्ठा होताच, या मंदिराचे छायाचित्र, विडिओ तसेच रील मोठ्याप्रमाणात समाज माध्यमांवर प्रसारित होऊ लागले. त्यामुळे हे मंदिर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले आणि हे मंदिर पाहण्यासाठी भक्तांची मंदिरात गर्दी होऊ लागली. तसेच मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराचे सुशोभीकरण देखील आकर्षक असे करण्यात आले आहे. या परिसरात नागरिकांना बसण्यासाठी भलीमोठी आसन व्यवस्था आहे.

नागरिकांसह दूरचित्रवाहिनीवरील मालिकांचे कलाकार दिग्दर्शक यांना देखील या मंदिराबाबत आकर्षण वाटू लागले आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून या मंदिरात काही मालिकांचे चित्रीकरण होऊ लागले आहे. झी मराठी वाहिनीवरील सध्या नव्याने सुरू झालेली ‘कमळी’ या मालिकेतील काही एपिसोड्सचे चित्रीकरण ठाण्यातील प्रति तुळजापूर मंदिरात करण्यात आले आहे. त्यामुळे ठाण्याचे तुळजाभवानी देवीचे हे मंदिर आणखी प्रसिद्ध होऊ लागले आहे.

ठाण्यातील तुळजाभवानी मंदिराची वैशिष्ट्ये

सुमारे दोन हजार टन काळ्या पाषाणाचा वापर करुन ३३ फुटांचा कलश आणि त्यासमोर नवग्रह, प्रवेश कलश, २६ खांब, २० गजमुखांची आरास, मंदिरासमोर हवनकुंड, १०८ दिव्यांची दीपमाळ आदींनी सुसज्ज असे हे मंदिर साकारण्यात आले आहे. २६ खांब हे अंखड आहेत. मंदिरात प्रवेशद्वार, महामंडप आणि मदिराचे गर्भगृह अशी तीन टप्प्यात मंदीराची रचना करण्यात आलेली आहे. वैदीक शास्त्रामध्ये नवग्रहाला महत्व असून हे नवग्रही मंदिरात स्थापित करण्यात आलेले आहेत.