बदलापूर : अंबरनाथ शहरानंतर बदलापूर शहरातही वाहतूक व्यवस्थापनासाठी पालिकेने सिग्नल यंत्रणा बसवली. मात्र बेशिस्त वाहनचालक आणि बेकायदा पार्किंगमुळे चौकाचौकात कोंडी होत असल्याचे चित्र आहे. सिग्नलची शिस्त पाळली जात नसल्याने सिग्नलवर वादही उफाळून येत आहेत. प्रामाणिकपणे सिग्नल पाळणाऱ्या वाहनचालकांच्या मनस्तापात यामुळे भर पडते आहेत. त्यामुळे वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी होते आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये गेल्या काही दिवसात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. दोन्ही शहरातील जवळपास सर्वच महत्वाचे रस्ते कॉंक्रिटचे असल्याने खड्ड्यांमुळे कोंडीचा ताप वाहनचालकांना सहन करावा लागत नाही. मात्र दोन्ही शहरात बेशिस्त वाहनचालक आणि बेकायदा पार्किंगमुळे सध्या वाहतूक कोंडीची समस्या वाढते आहे.
बदलापूर शहरात गेल्या महिन्यात सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली. शहरात आतापर्यंत १४ वर्दळीच्या चौकांमध्ये सिग्नल बसवण्यात आले आहेत. त्यासाठी अरूंद चौकांचे रूंदीकरण करण्यात आले. त्यातील अनेक चौकांचे रूंदीकरण अजुनही सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी फुटून वाहतुकीला शिस्त लागेल असा पालिका प्रशासनाला विश्वास आहे. मात्र बदलापुरात नव्याने बसवण्यात आलेली ही सिग्नल यंत्रणा वाहनचालकांच्या पचनी पडताना दिसत नाही. विविध चौकांमध्ये आजही सिग्नलवर लाल दिवा लागल्यानंतरही वाहनचालक वाहने रेटताना दिसत आहेत. त्यामुळे हिरवा दिवा लागलेल्या मार्गिकेवरून येणाऱ्या वाहनांचा गोंधळ उडतो आहे. यामुळे अपघाताची भीती व्यक्त होते आहे. बदलापूर पश्चिमेत काही सिग्नलच्या ठिकाणी ऐन चौकात रिक्षा, दुचाकी आणि इतर वाहने उभी केली जातात. त्यामुळे सिग्नल सटल्यानंतरही वाहनांना वळण घेण्यात अडचणी येतात. परिणामी सिग्नलची वेळ संपून जाते. अशा चौकात वाहनचालकांना खोळंबून राहावे लागते. त्यामुळे बेशिस्त पार्किंग आणि वाहनचालकांवरही कारवाई करावी अशी मागणी केली जाते आहे.
वाहनचालकांत खटके
कल्याण बदलापूर मार्गावर विविध चौकांमध्ये बेशिस्त वाहनचालक मार्गिकांची शिस्त पाळत नसल्याचे समोर आले आहे. उजवीकडे जायचे असतानाही डाव्या बाजूने सिग्नलची वेळ संपण्यापूर्वी धावण्याच्या नादात अनेकदा ते चुकीच्या मार्गिकेत जाऊन थांबतात. त्यामुळे मागून येणाऱ्या आणि सिग्नल सुरू असल्याने डावीकडे वळणाऱ्या वाहनचालकांना बेशिस्त वाहन चालकांच्या मागेच अडकून पडावे लागते. त्यामुळे बदलापूर, अंबरनाथ दोन्ही शहरात वाहनचालकांमध्ये खटके उडू लागले आहेत.
चौकातले खड्डे बुजवा
अंबरनाथ शहरातल्या मटका चौक, महात्मा गांधी चौक, लादी नाका या चौकांमध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत. सिग्नल सुटल्यानंतर या चौकांमध्ये वाहने अडकून पडत आहेत. त्यामुळे वाहनचालकांत संतापाचे वातावरण आहे. लादी नाका चौकात बदलापुरला जाणाऱ्या मार्गिकेवर मोठा खड्डा पडला आहे. तेथे अनेक वाहने अडकून पडत आहेत.