ठाणे : ठाणे महापालिकेच्या मॅरेथाॅन स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकाचा घरी गेल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. बेने देवासी असे त्यांचे नाव असून ते ठाण्यातील वसंत विहार भागातील रहिवासी आहेत. यापूर्वीही अनेक मॅरेथाॅन स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नव्हते. नेहमी आरोग्य सदृढ ठेवण्याकडे कल असलेल्या बेने यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मॅरेथान स्पर्धेत त्यांनी पत्नीसह सहभाग घेतला होता.
ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ व्या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचे रविवार आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत हजारो स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेची सुरुवात ठाणे महापालिकेच्या पाचपाखाडी येथील मुख्यालयाजवळून झाली. स्पर्धेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखविला होता. त्यानंतर, टप्प्याटप्याने एकूण १२ गटातील स्पर्धांचा शुभारंभ महापालिका मुख्यालयासमोरील चौकातून करण्यात आला.
कोरोनापासून गेली पाच वर्षे खंडित झालेली ही स्पर्धा यंदा आबालवृद्धांचा सहभाग होता. यावेळी सहभागी धावपटूंचा उत्साह पाहून मॅरेथॉनला झेंडा दाखवल्यानंतर स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मॅरेथॉनमध्ये धावले. त्यांनी धावपटूंसमवेत काही अंतर सहभागी झाले होते.
…अन् मृत्यू झाला
या स्पर्धेत वसंत विहार भागात राहणाऱ्या बेने यांनी देखील त्यांच्या पत्नीसह सहभाग घेतला होता. २१ किलोमीटर स्पर्धेत धावल्यानंतर ते घरी गेले होते. परंतु घरी आल्यानंतर काहीवेळाने ते कोसळले. त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. बेने हे नेहमी विविध मॅरेथाॅन स्पर्धांमध्ये सहभाग घेत होते. तसेच, आरोग्य सदृढ असण्याकडे त्यांचा कल होता. अचानक त्यांचा मृत्यू झाल्याचे आश्चर्य होत असल्याचे त्यांच्या परिचयातील व्यक्तींनी सांगितले.