मालमत्ता संरक्षणासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न; संकेतस्थळावर ९ हजार ४७७ अधिकृत जागांची नोंदणी

ठाणे: जागेच्या नोंदी नसल्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेच्या अनेक मालमत्तांवर अतिक्रमण झाले आहे. आता हा प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाकडून मालमत्ता कर नोंदणीची विशेष मोहीम हाती घेण्यात आले आहे. याअंतर्गत आतापर्यंत वेगवेगळ्या विभागाच्या ९ हजार ४७७ अधिकृत जागांच्या नोंदणी तालुका स्तरावर पूर्ण झाल्या असून येत्या काही दिवसात ही मालमत्ता नोंदणी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या जागा आहेत. या जागांची जिल्हा परिषदेकडे नोंद नसल्यामुळे या जागांवर अतिक्रमण होण्याचे प्रकार वारंवार घडत होते. जिल्हा परिषदेच्या जागांवर होत असलेले अतिक्रमण रोखण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी ग्रामपंचायतस्तरावर मालमत्ता कर नोंदणी करण्याबाबत सर्व तालुक्यांना आदेश दिले. या जागांची नोंदणी पूर्ण व्हावी यासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये ८ जून रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली होती.

या मोहिमेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या अधिकृत जागांच्या नोंदणी करण्यात आल्या आहेत. यामध्ये बांधकाम विभाग, आरोग्य, प्राथमिक शिक्षण, पशुसंवर्धन, ग्रामीण पाणीपुरवठा, लघुपाटबंधारे अशा विविध विभागातील मालमत्तेचा समावेश आहे. शहापूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक म्हणजे ३ हजार २१ मालमत्ता असल्याची माहिती या मोहिमेतून समोर आली आहे. तर ठाणे तालुक्यात सर्वात कमी म्हणजे केवळ २७ मालमत्ता आहेत.  या मालमत्ता नोंदणी लवकरच जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर समाविष्ट करण्यात येणार असून त्या सर्वांना पाहता येणार आहेत.