बदलापूर पश्चिम विभागातील बदलापूर गाव परिसर वगळल्यास उर्वरित परिसर हा सगळ्यात जास्त वेगाने शहरीकरणाने वेढला जात आहे.
पूर्वीच्या महसुली गावांनुसार या परिसराचा विचार करता हेंद्रेपाडा, मांजर्ली, बेलवली आदी नावांनीच हा विभाग ओळखला जातो. पंरतु, गेल्या दहा वर्षांत झालेल्या शहरीकरणाने येथे नव्या प्रभाग रचनेनुसार आठ प्रभाग तयार झाले आहेत. वालवली, दीपाली पार्क या परिसराचा प्रभाग क्र २, अयोध्यानगरी, कृष्णा इस्टेट, मोहन तुलसी विहार यांचा मिळून प्रभाग क्र. ४ तर प्रभाग ५ हा हेंद्रेपाडा, आशाविहार, सवरेदय नगर या परिसरातून तर शनिनगर परिसराचा मिळून प्रभाग क्रमांक ६ तयार झाला आहे. मोहनानंद नगर, गणेश नगर, पाटील नगर आदी विभागांचे मिळून प्रभाग क्र. ७ व ८ तयार झाले आहेत. तसेच पवार कॉम्पलेक्स, बेलवली गाव मिळून ९ व १० असे प्रभाग झाले आहेत. प्रत्येक प्रभागात सरासरी साडेतीन हजारांच्या आसपास मतदार असून प्रभाग क्रमांक ९ मध्ये सर्वात कमी मतदार असून येथे २८५६ मतदार आहेत. तर, प्रभाग क्रमांक ९ मध्ये ४९६३ असे सगळ्यात जास्त मतदार आहेत. पूर्वी असलेल्या प्रभागांपेक्षा दुप्पट प्रभागांची येथे निर्मिती झाली असून ती केवळ नव्या इमारती व मोठमोठय़ा गृहप्रकल्पांमुळे. त्यामुळे साहजिकच येथे पाणी समस्या तीव्र झाली असून या परिसरातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. दिवसातून एकदाच पाणी आल्याने पाणी भरण्यासाठी घरी लोकांची तारांबळ होत असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने १५ टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतल्याने सोमवारी पूर्ण दिवस पाणी येथील नागरिकांना मिळत नाही. मांजर्ली परिसरात मोठय़ा प्रमाणावर गृहप्रकल्प उभे राहत असून हे सगळे गृहप्रकल्प येथून वाहणाऱ्या उल्हास नदीजवळच उभे राहत आहेत. २००५ च्या पुरात या परिसरात दोन मजले पुराच्या पाण्याची पातळी होती.
त्यामुळे नदीजवळील या प्रकल्पांना मंजुरी देताना पालिकेने भविष्यात पूरपरिस्थिती उद्भवल्यास नागरिकांच्या बचावाची कोणती तरतूद केली आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच अंतर्गत रस्त्यांची कामे या परिसरात चालू असून या परिसरातून विकास आराखडय़ातून निश्चित झालेला ६० फुटी रस्ता जात असून हेंद्रेपाडय़ातील काही ठिकाणी जागेच्या प्रश्नावरून अत्यंत आखूड झाला असल्याने अद्याप पूर्ण क्षमतेने चालू झालेला नाही. येथील दीपाली पार्क विभागात सध्या रस्ते चांगले झाले असून हेंद्रेपाडा, मोहनानंद नगर येथे सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे चालू असून यातील मोहनानंद नगर येथील काँक्रिटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून येथे काम सुरू असतानाच रस्त्याला तडे गेले आहेत.
रस्ते गायब
गांधी टेकडी ते हेंद्रेपाडा हा रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. बहुतांश अंतर्गत रस्ते खराब असल्याने नागरिकांची रस्त्यातून चालताना त्रेधातिरपीट उडत आहे. आजी-माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचे हे प्रभाग असल्याने प्रमुख ठरावीक प्रमुख रस्ते व निसर्ग उद्यानांची कामे चांगली झाली आहेत. परंतु, सत्तेत प्रमुख वाटा मिळूनही नागरिकांच्या अनेक मूलभूत समस्या येथे कायम राहिल्या आहेत. तसेच येथील प्रभाग क्रमांक पाचमध्ये रेल्वे स्थानकाजवळील सवरेदय नगर परिसराचा काही भाग येत असून येथे वाहनांच्या पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. स्टेशन परिसर अरुंद असल्याने या सवरेदय नगर परिसरात वाहने ठेवण्यात येतात. पालिकेमार्फत वाहनतळ निर्मितीसाठी कोणतेही पाऊल उचलेले नाही.
संकेत सबनीस, बदलापूर