सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करावा, असे सतत आवाहन पोलीस तसे सायबरतज्ज्ञांकडून केले जाते. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. वसईत राहणाऱ्या एका महिलेने आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर ‘१५ दिवस गावी जात आहोत’ असे स्टेट्स ठेवले. मात्र या स्टेट्सचा त्यांना मोठा फटका बसला आहे. हे स्टेट्स टाकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या घरात चोरी झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसईत राहणाऱ्या संतोष नायर (नाव बदललेले) हे आखातात नोकरी करतात. ते सुटीसाठी वसईत आले होते. वसईत काही दिवस घालविल्यानंतर ते कुटुंबीयांसह केरळला मूळ गावी गेले होते. गावी गेल्यावर त्यांच्या पत्नी सुजाता यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर ‘कुटुंबीयांसह पंधरा दिवस केरळात जात आहोत’ असा उल्लेख असलेले स्टेट्स ठेवले. त्यानंतर दोनच दिवसांत नायर यांच्या घरात चोरी झाली. चोरांनी घराचे लोखंडी ग्रील तसेच कुलूप तोडून घरात चोरी केली. दागिने तसेच मौल्यवान ऐवज आणि दागिन्यांसह सुमारे दोन लाखांचा ऐवज चोरून नेला. याबाबत नायर यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपण गावी केल्याचे स्टेट्स सार्वजनिक केल्यामुळे चोरांना कल्पना आल्याची शक्यता नायर यांनी व्यक्त केली आहे. मे महिन्याच्या सुटीत बंद घरे पाहून भुरटे चोर चोरी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु हल्ली चोरांचे सोशल मीडियावरही लक्ष असते, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

केवळ चोरीच नाही तर इतर अनेक गुन्ह्य़ांसाठी सोशल मीडियावरून माहिती मिळवली जात असते. अनेक जण बाहेरगावी गेल्याचे छायाचित्र टाकत असतात, कुटुंबीयांची माहिती देत असतात. त्यावरून घरात कोण कोण आहे याचा अंदाज लावता येऊ शकतो. त्यामुळे सोशल मीडियावर माहिती देताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The burglars robbed home due to status update on whatsapp
First published on: 26-05-2016 at 01:27 IST