ऑनलाइन शिक्षणाचा परिणाम

पूर्वा साडविलकर, निखिल अहिरे

ठाणे : राज्यात करोनाचा प्रादुर्भाव ओसरू लागल्याने शाळा पुन्हा नित्यनियमाने सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना दोन वर्ष ऑनलाइन पद्धतीने घरीच शिक्षण घेण्याची सवय लागल्याने लहान विद्यार्थ्यांना शालेय वातावरणाशी जुळवून घेताना बरीच कसरत करावी लागत असल्याचे निरीक्षण शिक्षक आणि शाळेतील कर्मचाऱ्यांकडून नोंदवले जात आहे. शाळेत एकाच जागी बसून शिक्षण घेण्याची बहुतांश विद्यार्थ्यांची सवय मोडली आहे. त्यामुळे वर्ग सुरू झाल्यावर जागेवर स्थिर नसणे, उत्साह नसणे, चिडचिडेपणा, वर्ग मित्रांसमवेत संवाद प्रस्थापित करताना अनेकांना जड जात आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये हा प्रकार अधिक दिसून येत असल्याचे मत काही शिक्षण तज्ञांनी नोंदविले आहे.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात लहान शिशू ते बारावीचे वर्ग जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार करोना नियमांचे पालन करत सुरू झाले आहेत. असे असले तरी गेले दोन वर्ष ऑनलाइन शिक्षणाची सवय लागल्याने अनेक विद्यार्थ्यांची वर्गातील वातावरणाशी जुळवून घेताना तारांबळ उडत असल्याचे निरीक्षण शिक्षकांनी व्यक्त केले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात बहुतांश शाळेत अद्यापही विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती नाही. वर्गात मोठय़ा संख्येने विद्यार्थी उपस्थित असले तरी त्यापैकी ५० टक्के मुलांचे वर्गात लक्ष नसल्याचे निदर्शनास आले आहे, अशी माहिती या भागातील काही शिक्षकांनी दिली. गेले दोन वर्ष ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे वर्गातील मित्रांसोबतचा संवाद खुंटला होता. त्यामुळे आताही मुलांना एकमेकांशी बोलण्यात रस नसल्याचे दिसून येते. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे मोबाइल हाताळण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे त्यांच्यात चिडचिडेपणा वाढला आहे. अशा विविध तक्रारी घेऊन पालकही सध्या बालमानसोपचार तज्ज्ञांकडे धाव घेत असल्याचे समोर आले आहे. तसेच जिल्ह्यातील काही शाळा व्यवस्थापकांकडूनही विद्यार्थ्यांचे शाळेत मन रमावे तसेच त्यांच्यातील चिडचिडेपणा कमी करण्यासाठी विविध उपक्रमांसह बालमानसोपचार तज्ज्ञांचे सत्र आयोजित करण्यात येत असल्याची माहिती जिल्ह्यातील एका बालमानसोपचार तज्ज्ञांकडून देण्यात आली.

टप्प्या टप्प्याने जडणघडण

ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी मोबाइलच्या जास्त आहारी गेले आहेत. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक हे एक त्रिकूट आहे. यातील पालकांनी आणि शिक्षकांनी सध्या विद्यार्थ्यांच्या घरातील आणि शाळेतील वर्तवणुकीबाबत आपापसात संवाद साधून माहिती घेतली पाहिजे. त्यानुसार विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे आणि इतर गोष्टींचे वेळापत्रक आखून घेतले पाहिजे. तसेच शाळा व्यवस्थापनांनीही सध्या मुलांना खेळ, काही मनोरंजनात्मक कार्यक्रम घेत वर्गामध्ये खेळीमेळीचे वातावरण ठेवावे. जेणेकरून विद्यार्थ्यांचा शाळेकडे येण्याचा ओढा वाढेल.

– डॉ. प्रियंका धर्माधिकारी, बालमानसोपचारतज्ज्ञ

शिक्षकांचे म्हणणे काय

  • विद्यार्थ्यांना शाळेत बसण्याची सवय व्हावी त्यांचे शाळेत मन रमावे यासाठी शालेय अभ्यासक्रमांसह विविध उपक्रम राबविले जात आहेत. तसेच शिक्षकही मुलांची मानसिकता पाहूनच त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती भिवंडीतील राहनाळ जिल्हा परिषद शाळेचे मुख्यध्यापक अजय पाटील यांनी दिली.
  • ऑनलाइन शिक्षणाचा सर्वात मोठा फटका हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसला आहे. मोबाइलची कमतरता, नेटवर्क अभावी अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहवे लागले. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांची अभ्यासाची सवय मोडली. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आता शाळेत दोन ते तीन तास बसण्यासही कंटाळा येत असून अभ्यासाकडे लक्ष नसल्याचेही दिसून येत आहे, असे भिवंडीतील आडगाव विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षिका संगीता पाटील यांनी सांगितले.