मराठी एकीकरण समितीचा पवित्रा; रेल्वे स्थानकावरील नामफलक बदलण्याची मागणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणत्याही वास्तूचे अथवा व्यक्तीचे नाव भाषा बदलली तरी बदलत नाही. मात्र हा नियम रेल्वेला मान्य नाही. भाईंदर रेल्वे स्थानकाचे नाव हिंदीत चक्क भायंदर असे करण्यात आले आहेच, शिवाय स्थानकावर मराठीत नामफलकच लावण्यात आलेला नाही. मराठी एकीकरण समितीने याविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला असून भाईंदर रेल्वे स्थानकात प्राधान्याने भाईंदर नामफलक लावण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

[jwplayer wN2mCKjd]

शहराचे नाव भाईंदर असे असले तरी मराठीतेर व्यक्तींकडून त्याचा उल्लेख भायंदर असाच केला जातो. रेल्वे प्रशासनाकडूनही भाईंदरचा उल्लेख भायंदर असाच चुकीच्या पद्धतीने केला जात आहे. काही वर्षांपूर्वी मीरा-भाईंदर महापालिकेने रीतसर ठराव करून केवळ भाईंदर असाच उल्लेख करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. महापालिकेच्या सर्व कागदपत्रांत तसेच वास्तूंवर भाईंदर असाच उल्लेख करण्यात आला आहे. महापालिका वगळता शहरातील रेल्वेसह इतर आस्थापनांनीदेखील शहराचा उल्लेख भाईंदर असाच करावा, असे महापालिकेने निर्देश द्यावेत तसेच त्याचा पाठपुरावा करावा, असाही निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यावर कोणतीही हालचाल झालेली नाही. परिणामी रेल्वे स्थानकात आजही भायंदर असाच फलक दिसतो. मराठी एकीकरण समितीने पुन्हा या मुद्दय़ाला हात घातला आहे. केंद्र सरकारने रेल्वेसाठी घालून दिलेल्या त्रिभाषा सूत्राचे पालन करणे आवश्यक आहे. त्यानुसार स्थानकात लावलेल्या माहिती फलकांवर मराठी भाषेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. परंतु स्थानकात असलेल्या फलकांवर मराठीचे अस्तित्वच नसल्याची माहिती समितीचे गोवर्धन देशमुख यांनी दिली.

.. तर न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार

मराठी एकीकरण समितीने याआधीही मराठीच्या मुद्दय़ावर आंदोलने केली आहेत. अगस्त क्रांती या गाडीला ऑगस्ट क्रांती हे नाव, नया अमरावती रेल्वे स्थानकात नवीन अमरावती, तिलकनगर स्थानकात टिळकनगर या नावाला प्राधान्य मिळवून देण्यात समितीला यश मिळाले आहे. आता भाईंदर स्थानकाचा मुद्दा समितीने हाती घेतला असून या प्रकरणी रेल्वे स्थानक व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले आहे. लवकरच पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेणार आहे. या ठिकाणीही न्याय न मिळाल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येतील, अशी माहिती गोवर्धन देशमुख यांनी दिली.

[jwplayer ypkKXM24]

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The demand to change the bhayander station name
First published on: 10-12-2016 at 02:34 IST