डोंबिवली – दोन दिवसापूर्वी डोंबिवली पश्चिमेत घनश्याम गुप्ते रस्त्यावर जयहिंद काॅलनी भागात रात्री उशिरा एक ४५ वर्षापूर्वीची सिमंतिनी सोसायटी इमारत अचानक पाठीमागच्या बाजुने खचली. या इमारतीमधील रहिवाशांना तातडीने पालिका अग्निशमन जवानांनी बाहेर काढले. ही इमारत पालिकेने तोडण्याची तयारी केली होती. परंतु, रहिवाशांनी आम्ही स्वताहून ही इमारत तोडून घेतो, असे कल्याण डोंबिवली पालिकेच्या ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना कळविले आहे.
जयहिंद काॅलनी भागात ही इमारत येते. ही इमारत पालिकेने तोडल्या नंतर त्या पाडकामाचा खर्च रहिवाशांना द्यावा लागणार होता. हा खर्चाचा भुर्दंड आपल्यावर नको म्हणून रहिवाशांनी स्थानिक माजी ज्येष्ठ नगरसेवक नंदू म्हात्रे, माजी ज्येष्ठ नगरसेवक जितेंद्र भोईर यांनी सोमवारी ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांची भेट घेतली. इमारत सुस्थितीत पाडकामाची यंत्रणा आमच्याकडे आहे. आजुबाजुच्या वस्तीला कोणताही धोका निर्माण होणार नाही आणि पालिकेला कोणत्याही प्रश्नाची उत्तरे द्यावी लागणार नाहीत, अशा पध्दतीने ही इमारत आम्ही रहिवाशांना पाडून देतो असे आश्वासन रहिवाशांच्यावतीने माजी नगरसेवक नंदू म्हात्रे, माजी नगरसेवक जितेंद्र भोईर यांनी साहाय्यक आयुक्त सावंत यांना दिले. यासंदर्भातची माहिती सावंत यांनी आपल्या वरिष्ठांना दिली.
रहिवाशांनी ही इमारत आमच्या जोखमीने पाडून घेत आहोत. इमारत तोडकाम करताना काही दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी पालिकेची नसेल, असे पत्र रहिवाशांनी पालिकेला द्यावे. त्यानंतर त्यांना तोडकामाची परवानगी दिली जाईल. अन्यथा, पालिकेने वरिष्ठांच्या आदेशावरून ही इमारत तोडण्याचे नियोजन केले आहे. अग्निशमन यंत्रणा, तोडकाम पथक सज्ज आहे, असे साहाय्यक आयुक्त सावंत यांनी सांगितले.
रहिवाशी स्वताहून ही इमारत तोडणार असल्याने पालिकेने रहिवाशांना लेखी पत्र त्यासंदर्भात देण्याचे कळविले आहे. हे पत्र प्राप्त होताच रहिवाशांना इमारत तोडकामासाठी मुभा दिली जाईल. तसेच या इमारतीमधील रहिवाशांंना या इमारतीत रहिवास असल्याबाबतची भोगवटा प्रमाणपत्रे पालिकेच्या ह प्रभागाकडून विनाविलंब वितरित करण्यात येतील, असे साहाय्यक आयुक्त सावंत यांनी सांगितले.
धोकादायक सिमंतिनी सोसायटीत एकूण २५ कुटुंबे वास्तव्याला होती. ही कुटुंंब दोन दिवसापूर्वीच आपल्या नातेवाईकांच्या आश्रयाला गेली आहेत. या इमारती मधील रहिवाशांची पालिकेने काही दिवस संक्रमण शिबीरात राहण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन केले होते. ४५ वर्षापूर्वीची दोन वर्षापूर्वी सुस्थितीत केलेली ही इमारत अचानक खचल्याने रहिवासी आश्चर्यचकित झाले.
डोंबिवली, कल्याणमध्ये जुन्या इमारती दुरुस्त करताना अनेक रहिवासी योग्य संरचनात्मक अभियंत्यांचा सल्ला घेत नाहीत. कमी खर्चात काम आटोपून देईल असा संरचनात्मक प्रशिक्षणार्थी अभियंता पकडतात. किंवा काही रहिवासी एखाद्या विकासक, वास्तुविशारदाचा सल्ला घेऊन दुरुस्तीची कामे करून घेतात. ही कामे तकलादू असतात. आवश्यक दुरुस्ती, देखभाल अशा कामातून होत नाही. त्यामुळे रहिवाशांंनी परवानाधारक संरचनात्मक अभियंत्यांकडून आपल्या इमारतीचा संरचनात्मक दुरुस्तीचा अहवाल घेऊन त्यांच्या सूचनेप्रमाणे दुरूस्त करावी, असे बांधकाम क्षेत्रातील एका जाणकाराने सांगितले.