ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते रुंदीकरण तसेच विविध प्रकल्पात बाधीत होणारे तसेच धोकादायक इमारतीमधील रहिवाशांचे वर्तकनगर भागातील भाडेतत्वावरील इमारतींमध्ये तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले. परंतु या इमारतींमधील सोयीसुविधांच्या अभावाबरोबरच इमारतीमधील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची साफसफाई केली जात नसल्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र आहे. या इमारतीमधील रहिवाशांची सोयीसुविधांअभावी गैरसोय होऊ नये म्हणून पालिकेने नोडल अधिकाऱ्यांची नेमणुक केली असली तरी त्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळेच रहिवाशांना अनेक समस्येंचा सामना करावा लागत असल्याचा आरोप तेथील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

ठाणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने रस्ते रुंदीकरण मोहिम काही वर्षांपुर्वी राबविली. यात महापालिका विकास योजनेतील रस्ते रुंद करण्याबरोबरच रस्ते एकमेकांना जोडण्याची कामे करण्यात आली. या कामात अडसर ठरणारी बांधकामे पालिकेने जमीनदोस्त केली. या बांधकामधारकांचे शहरातील भाडेतत्वावरील इमारतींमध्ये तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले. याशिवाय, विविध प्रकल्पात बाधीत होणारे तसेच धोकादायक इमारतीमधील रहिवाशांचेही अशा इमारतीत तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. शहराच्या विविध भागात भाडे तत्वावरील योजनेंतर्गत इमारती उभारण्यात आलेल्या असून त्यापैकी वर्तकनगर भागातील इमारतीत १४०० कुटूंब राहतात. या इमारतीमध्ये सोयी सुुविधांची वाणवा असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असतानाच, आता पुन्हा अशाच स्वरुपाच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.

वर्तकनगर भागातील दोस्तीच्या भाडे तत्वावरील इमारतीत सुरक्षारक्षकासाठी असलेल्या शौचालयाची दुरावस्था झाली आहे. इमारतीच्या परिसरातील फरश्या आणि कोबा उखडलेला दिसून येतो. त्यातील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने मच्छर होऊन रोगराई पसरण्याची भिती व्यक्त होत आहे. दोन वर्षानंतरही इमारतीत असलेल्या पाण्याच्या टाक्या अद्याप साफ करण्यात आलेल्या नसून यामुळे येथील रहिवाशी दुषीत पाणी पित असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील शौचालयामध्ये पाणी तुंबून ते इतरत्र पसरते. या इमारतीमध्ये सोयी सुुविधांची वाणवा असल्याच्या तक्रारी यापुर्वी पुढे आल्या होत्या. त्यावर तोडगा म्हणून पालिकेने नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. परंतु त्यांचेही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने इमारतीमधील समस्या अद्याप सुटू शकलेल्या नसल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात आले.

ठाणे महापालिकेच्या भाडेत्तवावरील इमारतीमधील रहिवाशांच्या तक्रारीसंदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेऊन त्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. – संजय हेरवाडे ,अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका