प्रभाग वाढल्यामुळे सर्वच पक्षांकडून परिसराकडे लक्ष; विविध कार्यक्रमांचे आयोजन
बेकायदा बांधकामांचे आगार आणि विविध समस्यांनी ग्रासलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा परिसराकडे अगदी काल-परवापर्यंत ढुंकूनही पाहात नसलेल्या राजकीय पक्षांनी यंदा मात्र या परिसरातील पालिकेच्या वाढलेल्या प्रभागांमुळे आपला मोर्चा या उपनगराकडे वळवला आहे. आगामी पालिका निवडणुकीत दिवा परिसरातील प्रभागांची संख्या दोनवरून ११ वर पोहोचली आहे. त्यामुळे शिवसेना, भाजप तसेच मनसेच्या नेत्यांनी या भागात आपला प्रभाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या परिसरात एका दिवसाचा खास दौरा केल्याने ठाण्याच्या निवडणुकीत दिव्याचे महत्त्व नव्याने अधोरेखित झाले आहे.
[jwplayer VXgwZHOX]
ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या दिवा परिसराकडे पालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे या उपनगरात अनधिकृत बांधकामाचे पेव फुटले. वाढलेल्या इमारतींमुळे या परिसराची लोकसंख्याही वाढली असून त्याचा परिणाम आगामी पालिका निवडणुकीत येथील प्रभागांच्या संख्येत वाढ होण्यात झाला आहे. असे असले तरी, या परिसरात प्राथमिक सुविधांचीही वानवा आहे. येथील कचराभूमीचा प्रश्नही बिकट होत चालला आहे. आजवर या परिस्थितीकडे राजकीय नेत्यांनी दुर्लक्ष केले होते. परंतु, दिव्यातील प्रभागांची संख्या दोनवरून ११वर पोहोचल्यानंतर आता सगळय़ांच्या नजरा या परिसराकडे वळल्या आहेत.
ठाणे महापालिकेच्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत दिव्यात दोन नगरसेवकांचा एक प्रभाग होता. दिव्यातून यापूर्वी शिवसेनेचे नगरसेवक निवडून यायचे. मागील निवडणुकीत मात्र हे समीकरण बदलले आणि येथे मनसेचे नगरसेवक निवडून आले. काही महिन्यांपूर्वी हे दोन्ही नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले. त्यामुळे धास्तावलेल्या मनसेने पक्षाचा गड शाबूत ठेवण्यासाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘उत्सव दिव्याचा’ हा महोत्सव आयोजित केला आहे. तर दुसरीकडे भाजपनेही दिव्यात पक्षाची ताकद वाढविण्यास सुरुवात केली असून त्यासाठी शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला जात आहे. तसेच या भागातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दिव्यातील विविध समस्यांचा आधार घेऊन त्या विषयांवर परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन भाजपने केले आहे. दिवा महोत्सवाच्या माध्यमातून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा संपूर्ण परिसरात खास दौरा आयोजित करण्यात आला होता. ठाणे महापालिका निवडणुकीत एरवी दिव्यात स्थानिकांच्या सभा वगळल्या तर अपवादात्मक परिस्थितीत बडय़ा राजकीय नेत्याचे दर्शन होत असे. मात्र, दिवा, दातिवली, डायघर, खिडकाळी अशा मागास प्रदेशात वाढलेल्या जागांमुळे ठाण्यातील आमदार, खासदार, पालकमंत्री, बडय़ा पक्षांच्या राज्यस्तरीय नेत्यांच्या फेऱ्या दिव्यात वाढल्यामुळे येथील रहिवाशांना विकासाची स्वप्ने पडू लागली आहेत.
[jwplayer vs9zGYJ0]