ठाणे महापालिका क्षेत्रातील माजिवाडा ते उपवन या पोखरण रस्ता क्रमांक २ मार्गावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या मार्गाचे सात वर्षांपुर्वी रुंदीकरण करण्यात आले. पण, या मार्गावरील गांधीनगर पुलाचे काम पुर्ण करण्यासाठी आठ महिन्यांची मुदत देण्यात आलेली असतानाही गेल्या सहा वर्षांपासून या पुलाचे काम रखडल्याची बाब समोर आली चित्र आहे. यामुळे रस्ता रुंद झाला असला तरी पुलाच्या भागातील अरुंद रस्त्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी होत असून त्याचा त्रास वसंतविहार, हिरानंदानी मेडोज, पोखरण क्रमांक-२ तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन चर्चेत, राष्ट्रवादीचा तीव्र आक्षेप; म्हणे, “डीजींना विनंती आहे की…”!

ठाणे शहरातील अंतर्गत मार्गांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. ही समस्या सोडविण्यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रस्ते रुंदीकरणाची कामे हाती घेतली. यामध्ये नितीन कंपनी ते इंदीरानगर, पोखरण रस्ता क्रमांक १ म्हणजेच कॅडबरी ते उपवन आणि पोखरण रस्ता क्रमांक २ म्हणजेच माजिवाडा ते उपवन या मार्गांचे रुंदीकरण करण्यात आले. पोखरण रस्ता क्रमांक २ म्हणजेच माजिवाडा ते उपवन या मार्गांचे २०१६ मध्ये रुंदीकरण करण्यात आले. हा रस्ता ४० मीटर रूंदीचा करण्यात आला. त्याचबरोबर या मार्गावरील गांधीनगर येथील पुलाची रूंदी वाढवण्याचे काम २०१७ मध्ये महापालिकेने हाती घेतले. साधारण ६ कोटींचे हे काम मंजूर करण्यात आले होते. पण ८ महिन्यात पूर्ण करायचे काम सहा वर्षे रखडले असून यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असल्याची बाब मनसेच्या जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी उघडकीस आणली आहे.

हेही वाचा >>>ब्राम्हण उद्योजकांची डोंबिवलीत परिषद, देशातून ९०० उद्योजकांची उपस्थिती

पोखरण रस्ता क्रमांक -२ वर नेहमीच नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. सकाळी आणि सायंकाळी या वर्दळीच्या वेळी नागरिक वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडतात. केवळ प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका ठाणेकरांना सहन करावा लागत आहे, असा आरोप महिंद्रकर यांनी केला आहे. ठाणे महापालिकेने २०१७ मध्ये ठेकेदाराला काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले असूनही ८ महिन्यात पूर्ण होणारे काम गेली सहा वर्षे कागदावरच आहे. तरीही याबाबत पालिका ठेकेदाराविरोधात कोणतीच कारवाई करत नाही. काम अपूर्ण असूनही पालिकेने मात्र आतापर्यंत या ठेकेदाराला सुमारे ५ कोटींपर्यंत इतकी रक्कमेची देयक मंजूर केले आहेत आणि त्यातील बहुतेक रक्कम देण्यात देखील आली आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. या पूलाचे काम अपूर्ण अवस्थेला ठाणे महापालिकाच जबाबदार आहे. आठ महिन्यात पूर्ण होणाऱ्या पूलाचे काम सहा वर्षे रखडले तरी पालिका याबाबत कोणतीच कारवाई करीत नाही. पूलाचे काम त्वरीत पूर्ण न केल्यास मनसेच्या वतीने संबंधित पालिकेच्या अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करत आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

More Stories onठाणेThane
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The work of gandhinagar bridge in thane has been stalled for six years leading to traffic jams amy
First published on: 06-02-2023 at 15:53 IST