कल्याण – कल्याणजवळील पत्रीपूल येथे शुक्रवारी सकाळी भरधाव वेगात असलेल्या एका मोटार कार चालकाने दिलेल्या धडकेत नेतिवली भागातील तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. मोटार कार चालकाने घटनास्थळावरून पळून न जाता तिन्ही विद्यार्थ्यांना पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. तेथे डाॅक्टरांनी उपचार करून नंतर या विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले. हे तिन्ही विद्यार्थी नेतिवली, पत्रीपूल भागातील रहिवासी आहेत. शुक्रवारी सकाळी ते पत्रीपूल येथून पायी मलंग रस्ता भागात असलेल्या आपल्या शाळेत पायी चालले होते. त्यावेळी हा अपघात झाला.

या अपघातात निखील तपेश्वर शर्मा (१५), दिपेश जितेंद्र शर्मा (१२), प्रिन्स रमेश शर्मा (१२) हे जखमी झाले. तन्मय अनिल राणे (२२) असे मोटार कार चालकाचे नाव आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात निखीलच्या तक्रारीवरून पोलिसांनी मोटार कार चालक तन्मय याच्या विरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – डोंबिवली आयरेतील बेकायदा साई रेसिडेन्सीतील रहिवाशांना ३० सप्टेंबरपर्यंत दिलासा

पोलिसांनी सांगितले, निखील, दीपेश आणि प्रिन्स हे शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे पत्रीपूल भागातून पायी मलंग गड भागात असलेल्या आपल्या शाळेत पायी चालले होते. रस्त्याच्या कडेने जात असताना पत्रीपूल दिशेकडून भरधाव वेगात एक मोटार आली. या मोटारीच्या धडकेत तिन्ही विद्यार्थी जमिनीवर पडले. अचानक घडलेल्या या घटनेने तिघे विद्यार्थी घाबरले. या विद्यार्थ्यांच्या हात, डोके, पाय आणि तोंडाला जखमा झाल्या आहेत.

घटनेनंतर हे विद्यार्थी रडू लागले. पादचारी आणि इतर वाहन चालकांनी त्यांना मदत केली. आरोपी कार चालक तन्मय यानेही अपघात स्थळावरून पळून न जाता, तिन्ही विद्यार्थ्यांना स्वताहून पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांच्या पालकांना ही माहिती देऊन घरी सोडण्यात आले.

हेही वाचा – डोंबिवलीतील श्री गणेश मंदिराला नांदेडच्या युवा उद्योजकाकडून ३० किलो चांदीचे दान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी तन्मय राणेवर बेदरकारपणे वाहन चालविल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे. साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एल. जी. मलावकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.