शहापूर तालुक्यातील खर्डी जवळील चांदा गावातील मामा भाचे व शहापूर येथील एका विवाहित तरुणाने जंगलात जाऊन एका झाडाला तिघांनी साडीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नसून गावकरी या आत्महत्येच्या घटनेबाबत उलटसुलट चर्चा करीत आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांनी भेट देऊन पहाणी करून मृतांच्या नातेवाईकाचे सांत्वनही केले.
१४ नोव्हेंबरपासून नितिन भेरे (रा. शहापूर), महेंद्र दुभेले (रा.चांदा ३०, खर्डी) व मुकेश घायवट ( रा. चांदा २२, खर्डी) हे तिघे घरुन बेपत्ता झाले होते. याबाबत सर्वत्र तपास करून त्यांचा शोध न लगल्याने त्यांच्या नातेवाईकांनी १७ नोव्हेंबर रोजी शहापूर व खर्डी पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. आज शुक्रवारी चांदा गावातील रूपेश सापळे या गुराख्याला गुरे चारत असताना एका झाडाला तीन लटकलेले मृतदेह दिसून आल्याने त्याने खर्डी पोलिसांना कळवले. त्यानंतर हे मृतदेह नितीन भेरे, महेंद्र दुभेले आणि मुकेश घायवट यांचेच असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.