तीन आरोपींना अटक; दोन लाखांची कातडी, रिव्हॉल्व्हर, काडतूस जप्त

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली : कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने शिळफाटा रस्त्यावरील काटई येथून वाघाचे आणि खवल्या मांजराचे कातडे विक्री करण्यासाठी आलेल्या तीन आरोपींना अटक केली. आरोपींकडून दोन लाख रुपयांची कातडी, दोन रिव्हॉल्व्हर, पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. मानपाडा पोलीस ठाण्यात वन्यजीव कायद्याने आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. तीनही आरोपी पेण तालुक्यातील रहिवासी आहेत.

सनी कुशन शिंदे (२०), अनिकेत प्रसाद (२२), जयदीप चोगले (२१) अशी अटक आरोपींची नावे आहेत. कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना शिळफाटा रस्त्यावरील काटई गाव येथे शुक्रवारी तीन जण वाघ, खवल्या मांजराचे कातडे विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक नितीन मुदगून, नीलेश पाटील, हवालदार दत्ताराम भोसले, राजेंद्र खिलारे, राजेंद्र घोलप, अरविंद पवार, अजित राजपूत, निवृत्ती थेरे, प्रकाश पाटील, हरिश्चंद्र बंगारा, राहुल ईशी आणि वन्यजीव अपराध नियंत्रण विभागातील हवालदार सपन मोहन, विजय नंदेश्वर, संदीप येवले यांनी काटई-बदलापूर पाइपलाइन रस्ता येथे सापळा लावला. ठरल्याप्रमाणे तीन जण रिक्षातून उतरले. हेच आरोपी आहेत याची खात्री पथकाला पटली. हातात वजनदार बॅग घेऊन रस्ता ओलांडत असताना पथकाने त्यांच्यावर झडप घातली. आरोपींनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यांना पकडण्यात पथकाला यश आले. त्यांच्या अंगझडतीमधून रिव्हॉल्व्हर, पिस्तूल, जिवंत काडतूस, बॅगेतून वाघाचे कातडे, नऊ खवल्या मांजरांची कातडी आढळून आली. ही कातडी कोठून आणली, कोणाला विक्री करण्यात येणार होती. शस्त्रे कोठून आणली याचा तपास सुरू आहे, असे संजू जॉन यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiger skin seized in dombivali zws
First published on: 24-07-2019 at 03:32 IST