कल्याण – नागरिकांनी तात्काळ रुग्ण सेवेसाठी १०८ क्रमांकावर संपर्क साधला की नागरिकांना तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी शासनाने काही वर्षापूर्वी तत्पर रुग्णवाहिका सेवा रुग्णांना उपलब्ध करून दिली आहे. परंतु, अनेक वेळा या १०८ क्रमांकावर संपर्क साधल्यावर रुग्ण नातेवाईकांना प्रतिसाद मिळत नाही. रुग्णवाहिका उपलब्ध झाली तरी काही वेळा रुग्णवाहिका चालक मनमानी करून रुग्ण रुग्णालयात नेण्यास विविध कारणे देऊन टंगळमंगळ करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. टिटवाळा इंदिरानगर भागात गुरूवारी असाच प्रकार उघडकीला आला आहे.

यासंदर्भात टिटवाळा येथील सामाजिक कार्यकर्ते विजय देशेकर यांनी रुग्णवाहिका चालकाने केलेल्या प्रकारासंदर्भात शासनस्तरावर वरिष्ठांपर्यंत तक्रारी केल्या. टिटवाळा पूर्व इंदिरानगर भागात एक गृहस्थ आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. या गृहस्थाला गुरूवारी अचानक फेफरे (फिट) आली. ते जमिनीवर कोसळले. त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यांना आरामाचा सल्ला देऊन घरी सोडले.

घरी आल्यानंतर या गृहस्थाला पुन्हा फेफरे आले. पाठोपाठ दोन वेळा फेफरे (फिट) आल्याने कुटुंबीय घाबरले. ही माहिती टिटवाळ्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना कल्याण उपशहरप्रमुख विजय देशेकर यांना समजली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या रुग्णाला तात्काळ चांगल्या पध्दतीचे वैद्यकीय उपचार मिळाले पाहिजेत म्हणून मुंबईत के. ई. एम. रुग्णालय येथे नेण्याचा निर्णय कुटुंबीयांकडून घेण्यात आला.

तातडीने देशेकर यांनी १०८ क्रमांकावर संपर्क करून तात्काळ रुग्णवाहिकेची नोंदणी केली. रुग्णवाहिका चालक टिटवाळा इंदिरानगर येथे संबंधित रुग्णाच्या घरापर्यंत पोहचला. रुग्णाला मुंबईत के. ई. एम. रुग्णालय येथे न्यायचे आहे असे अगोदरच रुग्णवाहिका चालकाला सांगण्यात आले होते. रुग्णाला तातडीने रुग्णवाहिकेत बसवून त्याला मुंबईत नेण्यासाठी कुटुंबीयांची धावपळ सुरू होती.

त्यावेळी रुग्णवाहिका चालकाने “ मी मुंबईत के. ई. एम. रुग्णालयात रुग्णाला घेऊन जाणार नाही. मी कल्याण मुरबाड रस्त्यावरील गोवेली येथील शासनाच्या रुग्णालयात रुग्णाला सोडतो. पण मी पुढे जाणार नाही”. तुम्ही मुंबईला जाणार नसाल तर किमान उल्हासनगरच्या मध्यवर्ति रुग्णालयात तरी रुग्णाला सोडा, अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते देशेकर आणि कुटुंबीय रुग्णवाहिका चालकाला करत होते. रुग्णवाहिका चालक मात्र मी गोवेली शिवाय कोठेही जाणार नाही अशी अडवणुकीची भूमिका घेऊन बसला होता.

कुटुंबीयांनी रुग्णाला रुग्णवाहिकेत बसविले. रुग्णवाहिका चालक हटण्यास तयार नव्हता. शेवटी आम्हाला उल्हासनगर अन्यथा के. ई. एम. येथे सोड अशी आग्रही भूमिका घेत कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेतून उतरण्यास नकार दिला. देशेकर यांनी रुग्णवाहिका चालकाची समजूत काढली. मग, रुग्णवाहिका चालक मला मुंबईत जाण्यासाठी डाॅक्टरांचे संदर्भ पत्र लागेल. ते मिळाले तर मी त्यांना घेऊन जातो, अशी भूमिका घेतली.

रुग्णाला तातडीने रुग्णसेवा मिळावी म्हणून १०८ क्रमांकावर रुग्णवाहिका शासनाने उपलब्ध करून दिली आहे. रुग्णाची परिस्थिती पाहता न अनेक वेळा हे रुग्णवाहिका चालक अडवणुकीची भूमिका घेतात याविषयी शासनाने अशा रुग्णवाहिका चालकांवर कारवाईचा बडगा उगारला पाहिजे. – विजय देशेकर, सामाजिक कार्यकर्ते, टिटवाळा.