कल्याण: टिटवाळा रेल्वे स्थानकातील रेल्वे फाटकावरील उड्डाण पुलाचे काम वेगाने पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे रेल्वे प्रशासनाचे नियोजन आहे. या पुलाच्या टिटवाळा पूर्व, पश्चिम आणि आंबिवलीकडे जाणाऱ्या पोहच रस्त्यांच्या कामांना कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. या विकास कामांमुळे टिटवाळा-मांडा शहरांची नेहमीच्या वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे.

उड्डाण पूल उभारणीच्या कामासाठी लागणाऱ्या निधीत काही अडचण आली तर पुलाचे काम ऑक्टोबरपर्यंत लांबू शकते, अशी शक्यता एका पालिका अधिकाऱ्याने व्यक्त केली. कल्याण डोंबिवली पालिका आणि मध्य रेल्वे यांच्या ५० टक्के भागीदारी तत्वाने टिटवाळा रेल्वे स्थानकातील मुंबई बाजुकडील रेल्वे फाटकावर पूल उभारणीचे काम सुरू आहे. या पूल उभारणीच्या कामाला महासभेने १० वर्षापूर्वी मंजुरी दिली आहे. या पुलाच्या कामाचा त्यावेळी असलेला ३१ कोटीचा खर्च आता ३७ कोटी ९७ लाखावर पोहचला आहे. एकूण खर्च ५० कोटीवर पोहचण्याची शक्यता अधिकाऱ्याने व्यक्त केली. एप्रिल २०२१ मध्ये पुलाच्या कामाला तांत्रिक मान्यता देण्यात आली. टी ॲन्ड टी इन्फ्रा कंपनी या कामाची ठेकेदार आहे. जून अखेरपर्यंत उड्डाण पूल पूर्ण करण्याचे बंधन ठेकेदारावर आहे, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास
A young motorman who tried to commit suicide at Bandra station on Western Railway was saved by a motorman Mumbai news
मुंबई: मोटरमनच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचा वाचला जीव

रेल्वे फाटक अडथळा

टिटवाळा-मांडा परिसरात नागरीकरण झाले आहे. मोठी गृहसंकुले या भागात उभी राहिली आहेत. टिटवाळा पूर्व-पश्चिम जाण्यासाठी उड्डाण पूल नाही. बहुतांशी वाहन चालक कल्याण शहर किंवा नगर-मुरबाड रस्त्याने इच्छित स्थळी जातात. टिटवाळा पूर्व पश्चिम भागात जाण्यासाठी पूल नसल्याने टिटवाळा रेल्वे स्थानक परिसर नेहमीच वाहन कोंडीने गजबजलेला असतो. रेल्वे मार्गातून एक्सप्रेस, लोकल निघून जात नाही तोपर्यंत प्रवाशांचा रेल्वे फाटकात खोळंबा होता. वाहनांच्या रांगा लागतात. प्रवाशांचा हा त्रास वाचविण्यासाठी १० वर्षापूर्वी पालिका प्रशासनाने टिटवाळा रेल्वे मार्गावर पूल उभारणीचे नियोजन केले होते. मध्य रेल्वेने रेल्वे फाटक मुक्त रेल्वे मार्ग मोहीम सुरू केली आहे. रेल्वे आणि पालिकेच्या सहकार्याने टिटवाळा रेल्वे फाटकात दोन वर्षापूर्वी पूल उभारणीचे काम सुरू आहे. या कामासाठी आता निधी उपलब्ध झाल्याने पूल उभारणीच्या कामाने गती घेतली आहे, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

पुलाची रचना

पुलावर एकूण ५४ तुळया ठेवण्यात येणार आहेत. ३० तुळया खांबांवर ठेवण्यात आल्या आहेत. रेल्वे हद्दीत पाच तुळया आहेत. मेगाब्लाॅक मिळेल त्याप्रमाणे रेल्वेकडून तुळया ठेवण्याची कामे केली जात आहेत. रेल्वेने या कामासाठी त्यांच्या वाटणीचा निधी लवकर द्यावा यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. तुळ्या ठेवण्याची कामे वेळेत पूर्ण झाली तर पावसाळ्यापूर्वी पूल वाहतुकीसाठी खुला होईल. निधीची अडचण आणि तुळया ठेवण्याचे काम रखडले तर पूल सुरू होण्यास ऑक्टोबर उजाडेल अशी शक्यता पालिका अधिकाऱ्याने व्यक्त केली.

पोहच रस्ते

पुलाच्या टिटवाळा पूर्व बाजुकडे ९० मीटर लांबीचा दुपदरी पूल आणि त्याला ७० मीटर लांबीचा चार पदरी पोहच रस्ता असणार आहे. पश्चिम बाजुकडे २५६ मीटर लांबीचा पूल आणि त्याला १५५ मीटर लांबीचा दुपदरी पोहच रस्ता असणार आहे. आंबिवलीकडे जाण्यासाठी १३७ मीटर लांबीचा पोहच रस्ता पुलाला जोडून बांधण्यात येत आहे. समृध्दी महामार्ग, बडोदा महामार्ग, पालिकेच्या वळण रस्ता, मुंबई-नाशिक-आग्रा महामार्ग दिशेने जाण्यासाठी पूल आणि पोहच रस्त्यांचा प्रवाशांना सर्वाधिक लाभ होणार आहे, असे पालिका शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी सांगितले.

“टिटवाळा रेल्वे स्थानकातील रेल्वे मार्गिकेवरील उड्डाण पूल आणि त्याच्या पोहच रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. ही कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.”

अर्जुन अहिरे, शहर अभियंता कडोंमपा