उद्यापासून होत असलेल्या टाळेबंदीतील निर्बंध जाहीर

ठाणे : करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण ठाणे शहर दहा दिवस टाळेबंद करण्याचा निर्णय अखेर महापालिका प्रशासनाने मंगळवारी घेतला असून त्यानुसार येत्या गुरुवार, २ जुलैपासून ते १२ जुलै रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत शहरात टाळेबंदी लागू असणार आहे. या टाळेबंदीच्या काळात शहरात काय सुरु असेल आणि काय बंद असेल, याची नियमावली प्रशासनाने जाहिर केली असली तरी त्यामध्ये जीवनावश्यक वस्तु, किराणामाल, भाजीपाला, दुध दुकाने खुली राहणार की नाही, याबाबत काहीच स्पष्टता देण्यात आलेली नाही. तसेच या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर महासाथ रोग अधिनियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या गोष्टींना परवानगी

’ आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी प्रवाशांच्या वाहतुकीस परवानगी. खासगी वाहनांत चालकाखेरीज केवळ एका प्रवाशाला परवानगी.

’ परवानगी असलेल्या जीवनावश्यक वस्तु, आरोग्य सेवा आणि या आदेशांतर्गत मान्य कृतींकरिता परवानगी.

’ घरी विलगीकरणात असलेल्यांनी नियमांचे पालन केले नाहीतर, संबंधित दंडात्मक कारवाईसाठी जबाबदार असेल आणि त्यांचे पालिका विलगीकरण कक्षात स्थलांतर.

’ व्यावसायिक आस्थापना कार्यालये, कारखाने, कार्यशाळा, गोदाम यासह सर्व दुकाने बंद असतील. सतत प्रक्रिया आणि फार्मास्युटिकल्स या आवश्यक असलेल्या उत्पादन आणि उत्पादक युनिटला परवानगी असेल. डाळ व तांदुळ गिरणी, खाद्य व संबंधित उद्योग, दुग्धशाळा, खाद्य व चारा इत्यादींच्या आवश्यक वस्तुंच्या उत्पादनाची युनीटस चालविण्यास परवानगी असेल.

’ सरकारी कार्यालये या कालावधीत कमीतकमी कर्मचाऱ्यांसह चालविण्यास परवानगी असेल. तिथे तीन फुट समाजिक अंतर पालन आणि सॅनिटायझरची व्यवस्था करणे आवश्यक असेल.

’ मद्य विक्रीची दुकाने केवळ घरपोच सेवेस परवानगी असेल.

’ जे उद्योग युनीट सुरू आहेत, ते तसेच सुरु राहतील.

’ लग्न सोहळ्यासाठी ५० व्यक्तींच्या मर्यादित संख्येस मुभा असणार आहे.

’ सर्व खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये सर्व वैकल्पिक शस्त्रक्रिया नियोजित करण्यात याव्यात.

या गोष्टींना मनाई

’ अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तुंच्या ने-आण करण्याशिवाय इतर सर्व कारणांकरीता महापालिका क्षेत्रात टाळेबंदी

’ इंटरसिटी, एमएसआरटीसी बस आणि मेटोसह सर्व सार्वजनिक परिवहन सेवांची वाहतूक.

’ टॅक्सी, रिक्षा यांची प्रवासी सेवा

’ सर्व आंतरराज्यीय बस आणि प्रवासी वाहतूक सेवांचे (खासगी वाहनांसह) तसेच खासगी ऑपरेटरांकडून कामकाज बंद. बाहेरून येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रवासी वाहनांना परवानगी असेल.

’ सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक बाबींच्या खरेदीसाठी पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध आहे.

प्रतिबंधातून यांना वगळले..

’ बँका, एटीएमस, विमा आणि संबंधित बाबी, प्रिंट आणि इलेक्टॉनिक माध्यमे, आय.टी आणि आयटीईएस, टेलीकॉम, टपाल, इंटरनेट, डाटा सेवा, पुरवठा साखळी, जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक आणि उपलब्धता, कृषी वस्तु, उत्पादने, सर्व वस्तुंची निर्यात आणि आयात. अन्न, फार्मास्युटिकल्स, वैद्यकीय उपकरणे यासह आवश्यक वस्तुंचे ई-कॉमर्स वितरण, रुग्णालये, फार्मेसि आणि ऑप्टिकल स्टोअर्स, फार्मास्युटिकल्स उत्पादन, त्याचे व्यापारी आणि त्यांची वाहतूक,

’ पेटोल पंप, एलपीजी गॅस, तेल एजन्सी, त्यांची गोदामे, त्यांच्याशी संबंधित वाहतूक आणि केवळ अत्यावश्यक सेवेतील पासधारक, सर्व सुरक्षा आणि सुविधा व्यवस्थापन सेवा, खासगी आस्थपना, आवश्यक सेवा आणि कोवीडच्या नियंत्रणासाठी साहाय करणाऱ्या सेवा.