सुभाष पथपाठोपाठ गोखले, राम मारुती मार्गाचेही रुंदीकरण
ठाणे रेल्वे स्थानक परिसर कोंडीमुक्त व्हावा यासाठी रस्ता रुंदीकरणाआड येणाऱ्या बेकायदा बांधकामांवर हातोडा चालविल्यानंतर आता मुळ शहरातील इतरही महत्त्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाताना महत्त्वाचा ठरणारा खोपट मार्ग, हरिनिवास चौक ते कोपरी उड्डाणपुल, राम मारुती मार्ग, गोखले रोड अशा प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ठाणे रेल्वे स्थानक परिसर कोंडीमुक्त करण्यासाठी महापालिकेने मध्यंतरी मोठय़ा प्रमाणावर मोहीम हाती घेत या भागातील बेकायदा बांधकामांवर हातोडा चालविला. ही मोहीम पूर्ण होताच आता रस्ता रुंदीकरणाची कामे वेगाने सुरू करण्याचा निर्णय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला असून शहरातील १० रस्त्यांची कामे येत्या पावसाळ्यापूर्वी सुरू केली जाणार आहेत. त्यासाठी सुमारे २८ कोटी ८१ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून या कामांच्या निविदा शीघ्रगतीने मागविण्यात येतील, अशी माहिती अतिक्रमण विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
अभियांत्रिकी विभागाच्या प्रस्तावानुसार रेल्वे स्थानक परिसरातील सुभाष पथ, शिवाजी पथ या मार्गावर काँक्रीटचा मुलामा देण्याचे ठरविण्यात आले असले तरी त्यासोबत आणखी आठ महत्त्वाच्या रस्त्यांचेही रुंदीकरण केले जाणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने दररोज लाखोंच्या संख्येने प्रवाशांची येजा सुरू असते. प्रवाशांच्या वाहनांचा हा भार गोखले आणि राम मारुती मार्गावर मोठय़ा प्रमाणावर पडत असतो. एक प्रकारे हे दोन्ही रस्ते शहराची जीवनवाहिनी मानले जातात. नव्या प्रस्तावात या दोन्ही रस्त्यांचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण केले जाणार असून त्यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय ठाणे रेल्वे स्थानक, एस.टी. बस स्थानक ते सिडको बसस्थानकाच्या रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील तीन हात नाका ते माजिवडा उड्डाणपुल, जवाहर बाग अग्निशमन केंद्र ते दत्त मंदिर, राघोबा शंकर मार्गास संलग्न असलेल्या रस्त्यांचेही रुंदीकरण तसेच काँक्रीटीकरण केले जाणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणारे मार्ग खड्डेमुक्त करण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा सूत्रांनी केला.

व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह
हरिनिवास चौक ते कोपरी उड्डाणपूल या महात्मा गांधी रस्त्याचे रुंदीकरण तसेच काँक्रीटीकरणाच्या कामासाठी दोन कोटी ७७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या मार्गावर सध्या उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू असल्याने चहूबाजूंनी हा रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावर नवे काम करणे शक्य होणे कठीण आहे. असे असताना पावसाळ्यापूर्वी तातडीने करावयाच्या कामांमध्ये या रस्त्याचाही समावेश करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.