एकापेक्षा जास्त घरे असली तरीही पुनर्वसनात एकच घर देण्याचा पालिकेचा निर्णय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे शहरातील रस्ता रुंदीकरण तसेच अन्य विकासप्रकल्पांच्या मार्गात येणारी बांधकामे पाडताना तेथील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचे धोरण स्वीकारणाऱ्या ठाणे महापालिकेने एखाद्या व्यक्तीची एकापेक्षा जास्त घरे बाधित होत असली तरी, संबंधित घरमालकाला एकाच जागेचा मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक भागांत एकाच व्यक्तीच्या नावे तीन ते चार बांधकामे असल्याचे रस्ता रुंदीकरण मोहिमेच्या पुनर्वसनादरम्यान पालिकेच्या निदर्शनास आले आहे. अशा बहुबांधकामधारकांना पुनर्वसनात एकापेक्षा जास्त घरे द्यावी लागत होती. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने एका व्यक्तीची एकापेक्षा जास्त घरे बाधित होत असली तरी, त्याला पुनर्वसन योजनेअंतर्गत एकच घर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मनमानी पद्धतीने बेकायदा घरे उभारून पुनर्वसनाच्या माध्यमातून अनेक घरे लाटण्याचे प्रयत्न करणाऱ्यांना धक्का बसणार आहे.

महापालिका प्रशासनाने गेल्या दीड वर्षांपासून शहरातील विविध भागात रस्ते रुंदीकरण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत  ठाणे, कळवा, मुंब्रा शहरातील हजारो बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. या बेकायदा बांधकामांतील घरांमध्ये राहणाऱ्यांचे पालिकेकडून बीएसयूपी आणि भाडे तत्त्वावरील घरांमध्ये पुनर्वसन करण्यात येत आहे. या पुनर्वसन प्रक्रियेदरम्यान बांधकामधारकांची कागदपत्रे तपासण्यात येत असून त्या आधारे संबंधित बाधितांचे पुनर्वसन केले जात आहे. शहरातील अनेक भागात एकाच व्यक्तीची तीन ते चार बेकायदा बांधकामे बाधित झाली असून या गणिताच्या आधारे पुनर्वसन करावे अशी मागणी बाधितांकडून केली जात आहे. परंतु, त्यामुळे एकाच व्यक्तिला पुनर्वसन प्रकल्पांमध्ये जास्त घरे द्यावी लागत होती.

या पाश्र्वभूमीवर एकापेक्षा अधिक बांधकामे असलेल्या बाधिताना केवळ एकाच जागेचा मोबदला देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ‘शहरातील अनेक भागात काही व्यक्तींनी दोनपेक्षा जास्त बेकायदा बांधकामे केली आहेत. अशा व्यक्तींना सर्वच जागेंचा मोबदला देऊ केला तर बेकायदा बांधकामे करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे शहरात बेकायदा बांधकामे करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळू नये म्हणून अशा व्यक्तींना एकाच जागेचा मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी स्पष्ट केले.

नेमके काय होणार?

* पालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांच्या जागेवर उभारण्यात आलेली बेकायदा बांधकामे हटवताना तेथील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येते.

* अनेक ठिकाणी एकाच व्यक्तींची दोन किंवा त्याहून अधिक बेकायदा बांधकामे असल्याने अशा व्यक्तींना त्याच प्रमाणात घरे द्यावी लागतात.

* या पुनर्वसन प्रक्रियेमुळे बेकायदा घरे उभारणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल व जास्त घरे लाटण्याच्या आमिषाने पुन्हा बेकायदा बांधकामे केली जातील, अशी भीती व्यक्त होत होती.

* या पाश्र्वभूमीवर पालिकेने एका व्यक्तींची एकाच किंवा वेगवेगळ्या ठिकाणी कितीही अनधिकृत बांधकामे बाधित होत असली तरी त्या व्यक्तींला एकच घर देण्याचा निर्णय घेतला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmc give one home to person infected multiple home by road widening project in thane
First published on: 12-04-2017 at 03:05 IST