मुंब्रा येथे अतिक्रमणावर कारवाई केल्याने महापालिकेचे साहायक आयुक्त सागर साळुंखे यांच्यावर जीवेघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा हल्ला साळुंखे यांनी चुकवला. सोमवारी सांयकाळी हा प्रकार घडला असून याप्रकरणी मोहम्मद कुरेशी याच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात ठाणे महापालिकेच्या माजिवाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर पालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरु केली होती.

मुंब्रा स्थानक परिसरात सार्वजनिक रस्त्यावर मोहम्मद सलीम कुरेशी याने हा रस्ता त्याच्या मालकीचा असल्याचा दावा करत याठिकाणी पाण्याच्या टाक्यांचे अडथळे उभारले होते. त्यामुळे स्थानक परिसरातून बाहेर पडणा-या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. याची माहिती सोमवारी सायंकाळी महापालिकेच्या मुंब्रा प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त सागर साळुंखे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाच्या माध्यमातून अडथळे काढून टाकले. त्यानंतर ते अग्निशमन दलाच्या कार्यालयात गेले. त्याठिकाणी मोहम्मद आला आणि त्याने टेबलवरील काच उचलून फोडली. तसेच फुटलेली काच घेऊन सागर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सागर साळुंखे यांनी हा हल्ला चुकवला आणि सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.

कल्पिता पिंपळे यांच्यावर झाला होता जीवघेणा हल्ला

ठाणे महापालिकेने रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार, महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या पथकामार्फत कारवाई सुरू होती. सायंकाळी ६.३० च्या सुमारास पिंपळे यांच्या पथकाने कासारवडवली येथील बाजारपेठेत भाजीविक्रेता अमरजीत यादव याची गाडी जप्त केली होती. त्यामुळे अमजीत याने पिंपळे यांच्या पाठीमागून येऊन त्यांच्या डोक्यावर सुऱ्याने वार करण्याचा प्रयत्न केला होता. हा हल्ला वाचविण्यासाठी पिंपळे यांनी सुरा पकडला. मात्र, त्यावेळी त्यांच्या डाव्या हाताची तीन बोटे कापली गेली होती. पिंपळे यांच्या बचावासाठी गेलेल्या त्यांच्या अंगरक्षकावरही अमरजीतने हल्ला केला होता. यात त्याच्याही डाव्या हाताचे बोट कापले गेले होते.

कल्पिता पिंपळेंना राज ठाकरे म्हणाले, ”तुम्ही लवकर बऱ्या व्हा, बाकी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनेनंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने अत्यंत शिताफीने अमरजीतला ताब्यात घेतले होते. त्यानंतर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात अमरजीत विरोधात तक्रार नोंदविली होती. या तक्रारीच्या आधारे, त्याच्याविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई करण्यात आली होती.