गणनेसाठी पालिकेकडून ८८ लाखांची तरतूद
रस्तारुंदीकरण तसेच बडय़ा बिल्डरांच्या गृहप्रकल्पांना मान्यता मिळवून देताना हजारो वृक्षांच्या कत्तलीला हिरवा कंदील दाखविणाऱ्या ठाणे महापालिकेने शहरातील प्रत्येक वृक्षाची मोजणी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वृक्षाची प्रजात, त्याची उंची, वय, घेर याची इंत्थंभूत माहिती गोळा केली जाणार आहे. येऊर तसेच खाडीकिनारी असलेल्या तिवरांच्या जंगलांचा मात्र या गणनेत समावेश केला जाणार नाही. तरीही ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांमधील वृक्षांची संख्या साधारणपणे साडेपाच लाखांच्या घरात जाण्याची शक्यता वृक्ष प्राधिकरणातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केली.
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गेल्या वर्षी अर्थसंकल्प सादर करताना पाच लाख वृक्ष लागवडीचा संकल्प सोडला आहे. दरवर्षी सुमारे अडीच लाख झाडे लावण्याचा महापालिकेचा संकल्प असून महापालिका आणि लोकसहभाग असा संयुक्तपणे हा उपक्रम राबविला जाणार आहे. ठाणे शहराला येऊर जंगलामुळे मोठा हिरवा पट्टा लाभला आहे. तसेच बंद पडलेल्या अनेक कंपन्यांच्या भोवताली अजूनही गर्द वनराई दिसून येते. असे असले तरी गेल्या काही वर्षांत ठाणे, घोडबंदर पटय़ात झपाटय़ाने उभ्या राहाणाऱ्या मोठय़ा गृहसंकुलांनी यापैकी हजारो झाडांवर कुऱ्हाड चालवली असून महापालिकेतील वृक्ष प्राधिकरण समितीचा कारभारही संशयास्पद राहिला आहे. आयुक्त जयस्वाल यांच्या कार्यकाळात शहरात मोठय़ा प्रमाणावर रस्तारुंदीकरणाची कामे सुरू आहेत. मूळ ठाणे शहरात तीन ठिकाणी उड्डाणपुलांची उभारणी सुरू आहे. ही कामे करताना जुनी झाडे कापली जात असल्याने रहिवाशांमध्ये नाराजी आहे. भास्कर कॉलनी, नौपाडा पट्टय़ात उड्डाणपुलाच्या आवश्यकतेविषयी स्थानिक रहिवाशांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. असे असताना स्थानिकांना विश्वासात न घेता मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने नेमलेल्या ठेकेदाराने येथील झाडांवर कुऱ्हाड फिरवल्याने रहिवाशी नाराज आहेत. या पाश्र्वभूमीवर शहरातील झाडाची मोजणी करण्याचा निर्णय आयुक्त जयस्वाल यांनी घेतला असून यासाठी सुमारे ८८ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.

जिओ टॅगिंगच्या सोबतीला जीपीएस मोजणी
ठाणे महापालिकेने शहरातील वृक्षांची पुरेपूर माहिती ठेवण्यासाठी मध्यंतरी जिओ टॅगिंग संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला होता. वृक्ष लागवड झाल्यानंतर त्या झाडांची नकाशावर जिओ टॅगिंग करण्यात येणार असून त्यामुळे झाडांची नोंद घेणे सहज शक्य होणार आहे. यामुळे भविष्यात महापालिकेने लावलेल्या झाडांची सगळी माहिती गुगल मॅपवर उपलब्ध होऊ शकणार आहे. एकीकडे जिओ टॅगची संकल्पना राबविताना झाडांची मोजणी करण्यासाठी जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील यांनी दिली. यामुळे प्रत्येक झाडाची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार असून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यास मदत मिळणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ठाणे शहरातील ठरावीक भागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर जीपीएस तंत्रज्ञानाद्वारे वृक्ष नोंदणीचा प्रयोग केला जाणार आहे. पर्यावरण प्रेमी, संस्था यांनाही या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. गेल्या वृक्ष गणनेत ठाणे महापालिका हद्दीत सव्वा ते साडेचार लाख झाडे आढळून आली होती. यंदा हा आकडा किमान साडेपाच लाखांच्या घरात पोहचण्याची शक्यता आहे, असा दावाही त्यांनी केला.