Thane News, ठाणे – ठाणे महापालिका परिवहन (TMT) विभागामार्फत टीएमटी गाडीने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई केली जात आहे. गेल्या सात महिन्यांत ३ हजार ५०२ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून ०७ लाख ५३ हजार ३८० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या परिवहन (TMT) विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

ठाणे शहरातील अंतर्गत मार्गांसह मुलुंड, बोरिवली, मिरा-भाईंदर अशा काही शहरांमध्ये ठाणे परिवहन विभागाच्या टीएमटी बस गाड्या धावतात. या बसगाड्यांमधून दररोज हजारोच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. प्रत्येक मार्गाच्या अंतरानुसार टीएमटी गाडीचे तिकीट दर ठरलेले आहेत. बसमधील वाहक प्रवाशांकडून भाडेदर आकारुन तिकीट देतात. परंतू, अनेकदा बसमध्ये गर्दी असल्यामुळे काही प्रवासी लबाडीने वाहकाची नजर चूकवून तिकीट काढत नाहीत.

अशा प्रवाशांवर कारवाई करण्याचे काम ठाणे परिवहन विभागामार्फत वारंवार केले जाते. गेल्या वर्षभरात विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. अशा प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी शहरातील विविध बस थांब्यावर तिकीट तपासणी करणारेे अधिकारी उभे असतात. तर, अनेकदा तिकीट तपासणी करणारे अधिकारी बसमध्ये देखील चढतात. यांच्याकडून प्रवाशांच्या तिकीटांची तपासणी केली जाते. या तपासणी दरम्यान एखादा प्रवासी विना तिकीट आढळून आल्यास त्यावर ताटकाळ दंडात्मक कारवाई केली जाते. त्या प्रवाशाकडून प्रवासी भाडेदरासह २०० रुपये दंड आकारण्यात येतो.

गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ या वर्षात विना तिकीट प्रवास करणाऱ्या ६ हजार ९७५ प्रवाशांवर ठाणे परिवहन विभागामार्फत कारवाई करण्यात आली होती. या प्रवाशांकडून १२ लाख १४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. या कारवाईमुळे प्रवाशांमध्ये जागृकता निर्मण होईल आणि विना तिकीट प्रवास करु नये याची समज मिळेल असे वाटले होते. परंतू, अजूनही विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झालेली नाही. गेल्या सात महिन्यांत म्हणजेच जानेवारी ते जुलै या कालावधीत ३ हजार ५०२ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून ०७ लाख ५३ हजार ३८० रुपयांचा दंड वसूल करण्यात आले असल्याचे ठाणे परिवहन विभागाकडून आलेल्या अहवालातून समोर आले आहे.

ठाणे परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात आलेल्या प्रवाश्यांची संख्या (महिन्यानुसार)

महिना प्रवासी संख्या दंड वसूल
जानेवारी ६१३ १,३१,६४९
फेब्रुवारी ४५३ ९६,९१४
मार्च५७२ १,२२,९७१
एप्रिल ५५४ १,२०,१३८
मे ३७५ ८०,९२०
जून४२६ ९१,५१५
जुलै ५०९ १,०९,२७३
एकूण ०३,५०२ ७,५३,३८०