वसईतली शाळकरी मुले अमली पदार्थाच्या विळख्यात
वसईच्या शाळांमध्ये अमली पदार्थ मिळत असून शाळकरी विद्यार्थी त्याच्या आहारी जात असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता वसई-विरार’ने काही दिवसांपूर्वी दिले होते. त्याचे तीव्र पडसाद उमटले असून पोलिसांसह विविध सामाजिक संघटनांनी अमली पदार्थाच्या तस्कारांना रोखण्यासाठी विविध प्रयत्न सुरू केले आहेत. वसईत अमली पदार्थाविरोधी काम करणाऱ्या अँटी ड्रग्ज ब्रिगेड या संघटनेने शाळेतील अमली पदार्थाच्या तस्करांना रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पालकांनीही याबाबत चिंता व्यक्त केली असून अनेक सामाजिक संघटनांनी शाळेत जनजागृती शिबिराचे आयोजन करण्याची तयारी दर्शवली आहे.
वसई-विरार शहरातील अनेक शाळांमध्ये ड्रग्ज पेडलर्समार्फत अमली पदार्थ पुरवले जात असल्याचे प्रकरण समोर आले आहे. शाळकरी मुलांना अमली पदार्थाच्या व्यसनापासून रोखण्यासाठी अँटी ड्रग्ज ब्रिगेडने पुढाकार घेतला आहे. ही संघटना वसईतल्या तरुण मुलांची असून अमली पदार्थ रोखण्याचे काम ती करत आहे. याबाबत माहिती देताना संघटनेचे अध्यक्ष फजलेहक कुरेशी यांनी सांगितले की, वसई-विरार शहरात अमली पदार्थाचे मोठे केंद्र बनले आहे. पण त्याचे लोण आता शाळकरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे ही गंभीर बाब आहे. आमच्या संघटनेने शाळकरी मुलांना यापासून वाचविण्याचा निर्णय घेतला असून त्या दृष्टीने आम्ही काम करणार आहोत. शाळेच्या आवारात संघटनेचे सदस्य पाळत ठेवून अमली पदार्थ विकणाऱ्यांची माहिती पोलिसांना देणार आहेत, तसेच शाळांमध्ये जाऊन जनजागृती अभियान संघटनेतर्फे राबविले जाणार आहे.
संघटनेने गेल्या वर्षी अनेक अमली पदार्थ तस्करांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. या संघटनेच्या सदस्यांनी अमली पदार्थाचे अनेक धंदे उद्ध्वस्त केले होते. व्यसनाधीन तरुणांना पुनर्वसन केंद्रात टाकून त्यांच्यावर उपचार करण्याचे कार्य सध्या ही संघटना करते. पोलिसांनी अपेक्षित सहकार्य न केल्याने संघटनेचे कार्य मंदावले होते. परंतु शाळकरी मुलांना अमली पदार्थ मिळत असल्याने संघटनेने पुन्हा सक्रिय होऊन काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
भल्या पहाटे अमली पदार्थाचा व्यवहार
वसई, नालासोपारा शहरांत अनेक ठिकाणी अमली पदार्थ तस्करांचे अड्डे आहेत. भल्या पहाटे हा व्यवहार चालतो. मुंबईहून आलेले अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना (ड्रग्ज पेडलर्स) वितरित केले जाते. या ड्रग्ज पेडलर्सचे जाळे शहराच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. ते शाळा, महाविद्यालयातल्या तरुणांना विकले जाते. या व्यवहारात लाखो रुपयांची उलाढाल असते. वसईतून मोठय़ा प्रमाणावर अमली पदार्थाना मागणी होत आहे. जास्तीत जास्त मुले या विळख्यात सापडली, तर मोठा धंदा होईल हे यामागचे गणित आहे. पूर्वी गांजा आणि चरस विकले जात होते, आता सर्वाधिक प्रमाण हे एमडी अर्थात म्याऊ म्याऊ या अमली पदार्थाचे आहे.