ठाणे : शहरातील वातूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या गोखले मार्ग आणि तीन हात नाका चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी येथील वाहतूक वर्तुळाकार पद्धतीने करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. या बदलानुसार गोखले रोड, लाल बहादूर शास्त्री मार्ग, हरिनिवास मार्गावरील वाहतूक एकेरी होणार असून हे बदल प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात येणार आहेत. तसेच गावदेवी मंडईच्या पाचशे मीटर परिसरात वाहने उभी करण्यास मनाई असणार आहे. हे बदल लागू करण्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नसली तरी वाहतूक पोलिसांकडून लवकरच हे बदल लागू केले जाणार आहेत.
ठाणे शहरातील भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने मंगळवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृह येथे एक बैठक पार पडली. या बैठकीला वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ.विनय राठोड, महापालिका उपायुक्त जे. जे. गोदेपुरे, उपायुक्त शंकर पाटोळे, उपनगर अभियंता विकास ढोले, माजी नगरसेवक सुनेश जोशी, परिवहन सदस्य विकास पाटील, व्यापारी अध्यक्ष मितेश शाह, विनय नाईक, शैलेश भावे यांच्यासह प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी आणि काही जागरूक नागरिक उपस्थित होते. शहरात निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विविध उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. वाहतुकीचे नियमन करताना ठाणेकरांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना आमदार केळकर यांनी बैठकीत दिल्या.
गावदेवी परिसरात रिक्षाचालक बेशिस्तपणे रिक्षा उभ्या करतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. ती दूर करण्यासाठी परिसरातील रस्त्यांवर पाचशे मीटरपर्यंत वाहने उभी करण्यास मनाई करण्यात यावी. प्रायोगिक तत्वावर हे बदल लागू करण्यात यावेत, अशी सूचना केळकर यांनी केली. या भागात येणाऱ्या दुचाकीसाठी गावदेवी भाजी मंडई इमारतीमधील वाहनतळ खुले करावे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे दीड महिन्याचा कालावधी जाणार असून तोपर्यंत महापालिका प्रशासनाने स्वतः वाहनतळ सुरू करावे, याबाबतही चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर प्रायोगिक तत्त्वावर मल्हार सिनेमा ते तीन हात नाका हा रस्ता एकेरी करण्यात येणार असून तीन हात नाक्यावरून हरिनिवास सर्कल टेलिफोन एक्सचेंज येथून गोखले रस्त्याचा दिशेने जाता येणार आहे. हा बदल प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार असून त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला तर तो कायम ठेवण्यात येणार असल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले. शहरातील विविध रस्त्यांवर वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमन करण्यासाठी काही प्रयोग सुरू केले आहेत. त्याचा ठाणेकरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.