ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातून जाणाऱ्या घोडबंदर मार्गालगत १५ ते १६ महत्वाकांक्षी (अस्पिरेशनल) शौचालये उभारणीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार करून निविदा काढल्या होत्या. त्यास प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र असतानाच, घोडबंदर मार्गावर रस्ते जोडणी, मेट्रो आणि उड्डाण पुलांच्या कामामुळे जागाच उपलब्ध नसल्याने शौचालये उभारणीचा प्रकल्प गुंडाळण्याचा विचार पालिका प्रशासनाने सुरू केल्याचे माहिती पालिका सुत्रांनी दिली.

ठाणे महापालिका क्षेत्रातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये राहते. येथे राहणाऱ्या बहुतांश नागरिकांना सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा लागतो. यामुळेच पालिकेने सार्वजनिक शौचालयाच्या दुरुस्तीसह स्वच्छतेवर भर दिला होता. त्याचाच एक भाग म्हणून काही महिन्यांपूर्वी ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ उपक्रमांतर्गत शहरातील नऊशे सार्वजनिक शौचालयांपैकी सातशे शौचालयांचे नूतनीकरण करण्यात आले. त्यापाठोपाठ शहरातील मुख्य रस्त्यांवर तसेच झोपडपट्टी भागात ३० कंटेनर शौचालये उभारण्यात आली.

घोडबंदर मार्गावर शौचालयाची व्यवस्था नसल्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांची गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पालिकेने १५ ते १६ महत्वाकांक्षी (अस्पिरेशनल) शौचालये उभारणीचा प्रस्ताव तयार केला होता. या कामासाठी पालिकेने निविदाही काढल्या होत्या. परंतु त्यास प्रतिसाद मिळत नव्हता. दरम्यान, घोडबंदर मार्गावर आता मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीचे काम सुरू आहे. मेट्रो मार्गिकेसह स्थानकांची उभारणीचे काम सुरू आहे. तसेच उड्डाण पुल उभारणीची कामे सुरू आहेत. यामुळे महामार्गालगत आता शौचालये उभारणीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे पालिकेने हा प्रस्तावच गुंडाळण्याचा विचार सुरू केल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. या संदर्भात ठाणे महापालिका प्रशासनाकडून मात्र प्रतिक्रीया मिळू शकली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय होता प्रस्ताव

महत्वाकांक्षी शौचालयांमध्ये स्पर्शरहित फ्लशिंग, स्तनपान कक्ष आणि स्वयंचलित सॅनिटरी नॅपकिन इन्सिनरेटर अशा सुविधा असतात. दहा सीटच्या शौचालयांसाठी अंदाजे ३० लाख रुपये खर्च येतो. त्यामध्ये प्रति सीटसाठी एक लाख याप्रमाणे दहा लाख रुपये शासनाकडून निधी दिला जाणार होता. तर, उर्वरित खर्च ठेकेदार करणार होता. तसेच संबंधित ठेकेदार शौचालयाचे संचलन करणार होता आणि शौचालय देखभाल व दुरुस्तीचा खर्च करणार होता, अशा स्वरूपाचा प्रस्ताव होता.