कल्याण शीळ रस्त्यावर कल्याण ते तळोजा मेट्रो मार्गाची कामे सुरू आहेत. या रस्त्याच्या मध्यभागी आधार खांब उभी करण्याची कामे पूर्ण झाली आहेत. आता या काँक्रीट खांबांवर तुळया (गर्डर) ठेवण्याची कामे मेट्रोच्या ठेकेदार कंपनीला करायची आहेत. ही कामे करताना कोणताही अडथळा नको आणि दुर्घटना टाळण्यासाठी वाहतूक विभागाने सोमवारपासून (ता.११) ते रविवार (ता. ३१ ऑगस्ट) या वीस दिवसांच्या कालावधीत शिळफाटा रस्त्यावर रात्री पावणे बारा ते पहाटे पाच वाजेपर्यंत वाहतूक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक बदलाची अधिसूचना काढली आहे. रात्रीच्या वेळेत वाहनांची संख्या कमी असते. त्यामुळे या वेळेत ही तुळया ठेवण्याची कामे केली जाणार आहेत.

एमएमआरडीएच्या नियंत्रणाखाली गवार कन्स्ट्रक्शन कंपनीकडून मेट्रो मार्गाची ही कामे सुरू आहेत. कल्याण तळोजा मेट्रो मार्गासाठी पत्रीपूल ते रूणवाल चौक, मानपाडा चौक ते सोनारपाडा चौक, सुयोग रिजन्सी अनंतम प्रवेशद्वार ते व्यंकटेश पेट्रोल पंप दरम्यानची कामे प्रगतीपथावर आहेत.

या तीन टप्प्यातील मेट्रो मार्गाच्या आधार खांबांवर तुळया ठेवण्याची कामे येत्या वीस दिवसात टप्प्याने केली जाणार आहेत. त्यामुळे हा वाहतूक बदल करण्यात आला आहे, असे उपायुक्त शिरसाट यांनी सांगितले. ११ ऑगस्ट ते २० ऑगस्ट दरम्यान मानपाडा चौक ते सोनारपाडा चौक दरम्यान तुळया ठेवण्याची कामे केली जाणार आहेत. २१ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट कालावधीत सुयोग हाॅटेल रिजन्सी अनंतम ते व्यंकटेश पेट्रोल दरम्यान तुळया ठेवण्याची कामे ठेकेदार कंपनीकडून केली जाणार आहेत.

वाहतूक बदल

मेट्रो मार्गाच्या तुळया ठेवण्याच्या कामांमुळे ११ ऑगस्ट ते २० ऑगस्ट कालावधीत कल्याण शीळ रस्त्याने कल्याणकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मानपाडा चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने मानपाडा चौक येथे डावे वळण घेऊन सेवा रस्त्याने सोनारपाडा चौक येथे जाऊन तेथून कल्याण शीळ रस्त्यावरील नियमितच्या मार्गिकेतून धावतील.

२१ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत कल्याण, डोंबिवलीकडून सुयोग हाॅटेल, रिजन्सी अनंतम प्रवेशव्दार चौक येथून शीळफाटा, मानपाडा जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सुयोग हाॅटेल, रिजन्सी अनंतम चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

ही वाहने सुयोग हाॅटेल, रिजन्सी अनंतम चौक येथून खांब क्रमांक ११० येथून उजवीकडे वळण घेऊन कल्याणकडे येणाऱ्या मार्गिकेवरून खांब क्रमांक १२८ व्यंकटेश पेट्रोलपंप समोरून डावे वळण घेऊन नियमितच्या शीळ मार्गिकेतून पुढे जातील.

शीळ, मानपाडा रस्त्याने कल्याणकडे येणाऱ्या वाहनांना सोनारपाडातील डोंंबिवली नागरी सहकारी बँक चौक (डी. एन. एस.) येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने डी. एन. एस. चौकातून खांब क्रमांक १४४ येथून सेवा रस्त्याने सुयोग हाॅटल रिजन्सी अनंतम चौक येथून पुन्हा कल्याण रस्त्याने इच्छित स्थळी जातील. अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना यामधून मोकळिक देण्यात आली आहे.