ठाणे : गेल्या वर्षभरापासून कल्याण-शीळ मार्गाच्या रुंदीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे हा मार्ग वाहतूक कोंडीचे केंद्र बनला आहे. त्यातच या मार्गावर काही बेशिस्त दुचाकी आणि कारचालक उलटय़ा दिशेने प्रवास करत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीत अधिकची भर पडत आहे. हे वाहनचालक अतिशय वेगाने उलटय़ा दिशेने येत असल्यामुळे या मार्गावर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे गेल्या वर्षभरापासून कल्याण-शीळ मार्गाच्या रुंदीकरणाचे आणि काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळे हा मार्ग अनेक ठिकाणी उंच सखल आणि निमुळता झाला आहे. त्यातच पावसामुळे या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्याच्या कामाचा वेग अतिशय मंद असल्यामुळे या मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
सध्या उपनगरीय लोकल वाहतूक बंद असल्यामुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूरमधील नोकरदारवर्ग या मार्गाने प्रवास करत आहेत. त्यामुळे कल्याण-शिळ मार्गावर बस आणि खासगी वाहनांची संख्या वाढली आहे. वाहनांच्या वाढलेल्या भारामुळे सकाळ आणि सायंकाळच्या या रस्त्यावर अजस्र वाहतूक कोंडी होऊ लागली असून १५ ते २० मिनिटाच्या प्रवासाला एक ते दीड तासाचा कालावधी लागत आहे. त्यातच अधिकची भर म्हणजे या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी काही बेशिस्त दुचाकी आणि चारचाकी चालक विरुद्ध दिशेने मार्ग काढतात.
हे सर्व वाहनचालक काटई नाका, पलावा जंक्शन, देसई गाव, खिडकाळी येथून विरुद्ध दिशेला शिरत असून त्यांचा वेगही अधिक असतो. त्यामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूच्या वाहतुकीचा वेग मंदावतो आणि कोंडी वाढत जाते. या वाहनचालकांची बेशिस्ती दिवसोगणिक वाढत असल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
कल्याण-शीळ फाटा मार्गावर वाहतूक कोंडीमुळे डोकेदुखी वाढलेली असतानाचा गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर काही बेशिस्त वाहनचालक वेगात विरुद्ध दिशेने प्रवास करतात. त्यामुळे या मार्गावर वाहने चालवणे अधिक धोक्याचे झाले आहे.
– नंदकुमार जाधव, वाहनचालक, डोंबिवली
कल्याण-शीळ मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. अशा सर्व बेशिस्त वाहनचालकांकडून दंड वसूल केला जात आहे.
– अमित काळे, उपायुक्त वाहतूक शाखा