ठाणे पालिकेतील एका ज्येष्ठ नगरसेविकेच्या मुलाचा कल्याण शिळफाटा मार्गावरील प्रीमिअर कंपनीसमोरील भव्य मैदानावर गुरुवारी सायंकाळी शाही विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यापासून काही अंतरावर असलेल्या सागाव येथील पिंपळेश्वर मंदिर परिसरात आणखी चार लग्ने होती. वधुवरांना आशीर्वाद देण्यासाठी या ‘शाही’ सोहळ्याला राज्याच्या विविध भागांतून हजारोंच्या संख्येने वऱ्हाडी मंडळी या भागात दाखल झाल्याने सायंकाळी पाच ते रात्री ११ वाजेपर्यंत कल्याण-शिळ मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
विवाह स्थळी जाण्यासाठी एकाच दिशेने ही सगळी वाहने शिळफाटा रस्त्यावर शिरल्याने वाहनांची संख्या वाढल्याने ही वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. या मार्गावरून नियमितपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ही कोंडी नेमकी कशामुळे झाली याचा थांगपत्ताही नव्हता. त्यामुळे या ठिकाणी काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.  
घोळक्याने नाक्यानाक्यांवर उभे राहून तपासणी करणारे वाहतूक पोलीस सुरुवातीला या विवाह सोहळ्याविषयी गाफील राहिले. मात्र प्रीमिअर कंपनी परिसरात सायंकाळी सहानंतर वाहतूक कोंडीची तीव्रता वाढू लागली, तशी पोलिसांची तारांबळ उडाली. योग्य नियोजन नसल्याने सायंकाळी सात वाजेपर्यंत संपूर्ण रस्ता वाहनांनी भरून गेला. यात वऱ्हाडी मंडळींचीही मोठी गैरसोय झाली.  ठाणे पालिकेतील एका ज्येष्ठ नगरसेविकेच्या मुलाचा विवाह सोहळा डोंबिवलीजवळील प्रीमिअर कॉलनीसमोरील भव्य मैदानावर होता. डोंबिवलीजवळ गावात ही नगरसेविका राहते. या मैदानावर एका विकासकाचा ताबा आहे. त्याच्याकडून हे मैदान भाडय़ाने घेतले जाते. मैदानाच्या परिसरात वाहने उभी करण्यासाठी मुबलक जागा आहे. या लग्नाचे शाही आमंत्रण देण्यात आल्याने राज्याच्या विविध भागांतून बस, खासगी वाहनाने हजारो नागरिक या लग्न सोहळ्याला आले होते. मैदान परिसरातील वाहने ठेवण्याची क्षमता संपल्यानंतर वऱ्हाडी मंडळींनी वाहने कल्याण शिळफाटा रस्त्याच्या कडेला उभी केली. ही रांग शिळफाटा, सोनारपाडा, काटईनाका अशी वाढत गेली. मुख्य रस्त्याला ही वाहने उभी करण्यात आल्याने रस्त्यावरील वाहतुकीला या वाहनांनी अडथळा निर्माण केला. विविध भागांतून येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींना या वाहतूक कोंडीची कल्पना नसल्याने ते थेट लग्न सोहळ्याच्या मंडपाजवळ वाहने नेण्याच्या घाईत होते. यात मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडीला सुरुवात झाली. दुचाकीस्वार तर रस्ता दुभाजकावरून वाहने चढवून इच्छित स्थळी जाण्यासाठी धडपडत होते.
लग्न नको, कोंडी आवरा..
सागाव येथील पिंपळेश्वर मंदिरात गुरुवारी चार लग्ने होती. विविध भागांतून नागरिक वाहनाने येथे आले होते. त्यामुळे मंदिर परिसरात रस्ते, गल्लीबोळात वाहने उभी करण्यात आली होती. मानपाडा रस्त्याने येणारी वाहतूक या वाहनांनामुळे अडली होती. लग्नासाठी आलेली मंडळी एकाच जागी चार तास अडकून पडल्याने वैतागली होती. या मंडळींनी विवाहाला न जाता परतीचा प्रवास सुरू केला. ठाण्याकडून येणारे प्रवासी मुंब्रा, कळवा भागात अडकून पडले होते.