वसई पूर्वेला औद्योगिक वसाहत मोठय़ा प्रमाणात असूनही या ठिकाणी अरुंद रस्ता असल्याने त्याचा फटका कारखान्यांतील कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांना बसत आहे. औद्योगिक वसाहतीमुळे येथे नेहमीच वाहनांची वर्दळ असते. मात्र अरुंद रस्त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. वाहतूक विभाग आणि वसई-विरार महापालिकेकडून मात्र याकडे दुर्लक्ष झालेले असल्याची संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी दिलेली आहे.

वसई पूर्वेत मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांतून नोकरदार, कारखानदार येत असतात. त्याशिवाय अनेक अवजड वाहने धावत असतात. मात्र या ठिकाणी रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यावर नागरिकांना कोंडीला सामोरे जावे लागते. त्यानंतर वाहने पकडून कंपनीचा रस्ता धरावा लागतो. त्याचबरोबर सायंकाळी घरी जाणाऱ्या चाकरमान्यांना बराच वेळ कोंडीत अडकून राहावे लागत असल्याने घरी जाण्यास उशीर होतो. पर्यायी रस्ता नसल्याने औद्योगिक वसाहतीत जाणारी अवजड वाहनेही याच मार्गाचा अवलंब करत असल्याने कोंडीत अधिक भर पडत आहे. वसई रोड पूर्व येथील पेट्रोलपंप-वाघरीपाडा-वसई रोड स्थानकापर्यंतचा रस्ता हा अरुंद असल्यामुळे रोज सकाळ व संध्याकाळच्या सुमारास येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. वसई रोड पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर वेगवेगळे चार ते पाच रिक्षा स्टॅण्ड, फेरीवाल्यांचा बस्तान आणि परिवहनच्या ३० फुटांपेक्षा मोठय़ा बसमुळे नाहक वाहतूक कोंडी होत असते. या कोंडीचा त्रास सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला होतो. नवघर पूर्व येथे होत असलेल्या वाहतूक कोंडीबाबत पालिकेने पर्यायी मार्गाचा विचार केला आहे, मात्र त्याचे काम अद्याप पूर्ण झाले नाही.

पूल होणार कधी?

नवघर पूर्वेला अग्निशमन दलाला कोणती दुर्घटना घडली तर अरुंद रस्त्यामुळे अडथळा निर्माण होत असतो. राजवली-दिवाणमान खाडीवरील निर्माणाधीन पूल सध्या अपूर्ण अवस्थेत आहे. या पुलाचे बांधकाम २०१३-१४ ला सुरू करण्यात आले होते. दोन्ही बाजूंचे गर्डर टाकून काम बंद करण्यात आले. हा पूल १८ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अजून पुलाचे काम अपूर्णावस्थेत आहे. या प्रकल्पासाठी ३ कोटी १० लाख ७४२ रुपये खर्च मंजूर करण्यात आला होता. मात्र ठरावीक कालावधीत हे काम पूर्ण न झाल्यामुळे या कामाच्या मुदतवाढीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर. एच. जगदाळे यांनी सांगितले.