जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे वाहनांचा वेग मंदावून कोंडी

ठाणे : जिल्ह्यात रविवार सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा जोर सोमवारीही कायम होता. रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे वाहनांचा वेग मंदावून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. तर ठाणे शहरातील साकेत आणि घोडबंदर भागात सकाळच्या वेळेत दोन ट्रक बंद पडल्याने वाहतुकीचा बोऱ्या उडाल्याचे दिसून आले. दुपारनंतर शीळफाटा, मुंब्रा बाह्यवळण मार्ग, भिवंडी भागातील मार्गावर वाहतूक कोंडी झाली.

ठाणे जिल्ह्यात गेल्या आठवडय़ात सलग तीन दिवस नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. पावसाने धरलेला जोर, रस्त्यावरील खड्डे आणि कोकणाच्या दिशेने निघालेल्या गणेशभाविकांची वाहने यांमुळे ही कोंडी झाली होती. गुरुवापर्यंत ही कोंडी कायम होती. शुक्रवार, शनिवार आणि रविवार या सलग तीन दिवसांच्या सुट्टय़ांमुळे शहरातील कोंडी काही प्रमाणात कमी झाली होती. सोमवारी पुन्हा मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. यामुळे सकाळी कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला कोंडीचा सामना करावा लागला.

जिल्ह्यात रविवार सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरू झाला असून सोमवार दुपापर्यंत या पावसांचा जोर कायम होता. यामुळे काही सखल भागांमध्ये पाणी साचले होते. तसेच रस्त्यावरील खड्डय़ांमध्येही पाणी साचले होते. यामुळे खड्डे दिसून येत नसल्याने त्यात वाहने आदळत होती. त्याचबरोबर खड्डय़ांमुळे वाहनांचा वेग मंदावल्याने मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर कोंडी झाली होती. त्यातच ठाणे शहरातील साकेत आणि घोडबंदर भागात सकाळच्या वेळेत दोन ट्रक बंद पडल्याने वाहतुकीचा बोऱ्या उडाला. ही दोन वाहने रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी बराच अवधी लागल्याने या दोन्ही मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. मुंबई-नाशिक महामार्गावरील तीन हात नाका ते साकेत पुलापर्यंत आणि घोडबंदर भागातील मुंबई-अहमदाबाद मार्गावर कोंडी झाल्याने त्याचा फटका शहरातील अंतर्गत मार्गावरील वाहतुकीला बसला. कशेळी-काल्हेर, भिवंडी, मुंब्रा बाह्यवळण मार्ग आणि शीळफाटा भागात वाहतूक कोंडी झाली होती. दुपारनंतर पावसाने उसंत घेतली तर शहरांमध्ये कोंडी मात्र कायम होती. या कोंडीमुळे नागरिक हैराण झाले होते.

पावसामुळे तसेच रस्त्यावरील खड्डय़ांमुळे वाहनांचा वेग मंदावल्याने काही ठिकाणी कोंडी झाली. तसेच साकेत आणि घोडबंदर भागात दोन ट्रक बंद पडल्याने या दोन्ही मार्गावर कोंडी झाली.

– श्रीकृष्ण कोकाटे, प्रभारी उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा