कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : माजिवडा येथील गोल्डन क्रॉस चौक येथे गुरुवारी रात्री एका कारने अचानक पेट घेतला. त्याच वेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत एक रेडिमिक्स काँक्रीटचे वाहन थांबवून त्यातल्या पाण्याने ही आग आटोक्यात आणली. कारमधील मौल्यवान सामानही त्यामुळे सुरक्षित राहिले.

वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी या कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.

पुण्याहून ठाण्याच्या दिशेने गुरुवारी एक कार गुरुवारी रात्री येत होती. कार गोल्डन क्रॉस चौक परिसर ओलांडत असताना अचानक कारच्या पुढील भागातून धूर येऊ  लागला. त्यामुळे कारचालक सौरभ सिंग आणि त्यांची पत्नी तात्काळ कारमधून बाहेर पडले. काही क्षणांत कारने पेट घेतला. या घटनेची माहिती वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस हवालदार वसंत भोये, पोलीस शिपाई सचिन राठोड आणि श्रीकांत वानखेडकर यांनी पाणी टाकून ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आग आटोक्यात येत नसल्याने त्यांनी समोरच्या रस्त्यावरून जाणारे रेडिमिक्स काँक्रीटचे वाहन थांबविले. त्यातील पाण्याच्या साहाय्याने त्यांनी ही आग आटोक्यात आणली.

या कारमध्ये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असलेली एक पिशवी होती. पूर्ण गाडीने पेट घेण्यापूर्वीच आग आटोक्यात आल्यामुळे मौल्यवान साहित्याची ती पिशवीही सुरक्षित राहिली. सिंग दाम्पत्याने मदतीस धावून आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

वाहतूक पोलिसांच्या कापूरबावडी उपविभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. जी. लंभाते यांनीसुद्धा वानखेडेकर, भोये आणि राठोड या पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले.

पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या कार्यालयात या पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic police brought car fire under control zws
First published on: 22-12-2020 at 01:52 IST