कल्याण-शीळफाटा रस्त्यावर पुन्हा कोंडी; वाहनांच्या रांगांमुळे प्रवासी हैराण 

डोंबिवली : कल्याण-शीळफाटा मार्गावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होत असून अशाच प्रकारे बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी या मार्गावर कोंडी झाली होती. बुधवारी रात्री या मार्गावर एक ते दीड तास वाहने एका जागेवरच उभी होती. यामुळे रात्री कामावरून घरी परतत असलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. असे असतानाच गुरुवारी सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत या मार्गावर पुन्हा कोंडी झाल्याने त्याचा फटका नोकरदार वर्गासह प्रवाशांना बसला. या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी प्रवाशांना दोन ते अडीच तासांचा अवधी लागत होता. यामुळे शिळ फाटा रस्त्यावरील वाहनकोंडीचे ग्रहण अद्याप सुटत नसल्याचे चित्र आहे.

कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ आणि भिवंडी या परिसरातील अनेक नोकरदार नवी मुंबई, उरण, ठाणे, मुंबई, पनवेल परिसरात कामासाठी जातात. त्यासाठी ते कल्याण-शिळ फाटा मार्गाचा वापर करतात. मात्र, सायंकाळच्या वेळेत एकाच वेळी या रस्त्यावर वाहने येत असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. ही कोंडी टाळण्यासाठी अनेक जण रात्री नऊ ते १० वाजेपर्यंत काम करून त्यानंतर घरी जाण्यासाठी निघतात. परंतु त्यांनाही आता वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यात अवजड वाहतुकीमुळे कोंडीत भर पडते. रात्रीच्या वेळेत शिळ फाटा रस्त्यावर अवजड वाहने प्रवेश करतात. ही वाहतूक संथ गतीने सुरू असते. त्यातच रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे या वाहनांचा वेग आणखी मंदावतो. त्याचा परिणाम या मार्गावरील वाहतुकीवर होतो. या वाहनांच्या मागे इतर वाहनांच्या रांगा लागण्यास सुरुवात होते आणि काही वेळातच या मार्गावर प्रचंड कोंडी होते, असे एका प्रवाशाने सांगितले. बुधवारी रात्री या मार्गावर अशाच प्रकारे कोंडी झाली. या मार्गावर एक ते दीड तास वाहने एका जागेवरच उभी होती. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्याचा फटका नोकरदार वर्गासह या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला. असे असतानाच गुरुवारी सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत या मार्गावर पुन्हा कोंडी झाली होती. या कोंडीमुळे प्रवासी अक्षरश: हैराण झाले होते.

बदलापूरहून मुंबईला जाण्यासाठी आम्ही सकाळी ८.३० वाजता वाहन घेऊन निघालो. ९.३० वाजता आमचे वाहन शिळ फाटा मार्गावर पोहोचले. त्यानंतर तेथील कोंडीतून बाहेर पडण्यासाठी आम्हाला ११ वाजले, अशी माहिती एका प्रवाशाने दिली. दरम्यान, ही कोंडी फोडण्यासाठी कल्याण-शिळ फाटा रस्त्यावरील उड्डाणपूल, भुयारी मार्गांची प्रस्तावित कामे एमएमआरडीएने लवकर मार्गी लावावीत, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

‘प्रस्तावित कामे पूर्ण करा’

शिळ फाटा रस्त्यावरील वाहनांचा भार वाढला आहे. टाळेबंदी शिथिलीकरणानंतर रेल्वे वाहतुकीची सुविधा नसल्यामुळे अनेक नोकरदार स्वत:च्या खासगी वाहनाने प्रवास करीत आहेत. कल्याण, डोंबिवली परिसरातून मुंबई, नवी मुंबईकडे जाण्यासाठी शिळ फाटा हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहनांच्या वाढत्या भारामुळे वाहतूक कोंडी होत आहे. काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. रात्रीच्या वेळेत अवजड वाहने वाहतूक सुरू होते. त्यामुळे या ठिकाणी कोंडी होते. शिळ फाटा रस्त्यावरील सुरू असलेली कामे, उड्डाणपूल, भुयारी मार्गांची कामे पूर्ण झाल्यानंतर हा प्रश्न कायमचा निकाली निघेल. त्यामुळे ही कामे प्राधान्याने पूर्ण झाली पाहिजेत,’ अशी माहिती वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने दिली.