बदलापूरः गणेशोत्सवाला अवघे दहा दिवस उरले असताना घरगुती गणेशोत्सवांसह मंडळांचीही तयारी अंतिम टप्प्यात आहे. अनेक मंडळे मोठे गणपती मंडपांमध्ये गणेश मूर्ती नेण्यासाठी हालचाली करत आहेत. मात्र बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील उड्डाणपुलांवर मात्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे येथून प्रवास करताना त्रास सहन करावा लागतो आहे. विशेष म्हणजे दोन्ही उड्डाणपुलांवर तात्पुरती डागडुजी केली जाते आहे. मात्र त्यानंतरही खड्डे जैसे थे राहत असल्याने वाहनचालकांत संतापाचे वातावरण आहे.
बदलापूर शहरात पूर्व पश्चिम असा प्रवास करण्यासाठी एकमेव उड्डाणपूल आहे. रेल्वे स्थानकाच्या शेजारी असलेल्या या पुलाजवळ मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथून वाहने नेताना वाहने संथ गतीने जातात. परिणामी येथे वाहतूक कोंडी होते. गेल्या काही दिवसांपासून येथे वाहतूक पोलीस असतात. मात्र वाहनांना येजा करताना मोठा वेळ खर्ची घालावा लागतो. पूर्वेतील उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारावर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी येथे दुभाजक लावण्यात आले. त्यामुळे वाहने प्रवेशद्वारावर वळण घेण्याचे बंद झाले. मात्र उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे वाहने येथून जाताना वेळ घेतात. परिणामी कोंडी होते आहे.
अंबरनाथ शहरातही हीच परिस्थिती आहे. अंबरनाथ शहराच्या उड्डाणपुलावरही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. पूर्वेच्या दिशेला खड्ड्यांचे प्रमाण अधिक आहे. हुतात्मा चौकातून पुढे आल्यानंतर उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारावरच खड्ड्यांनी वाहन चालकांचे स्वागत होते. या खड्ड्यांची खोली दिवसेंदिवस वाढते आहे. यात पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी येथे खड्ड्यांत वाहने आदळतात. त्यामुळे वाहनांच्या भागांचे नुकसान होते आहे. तसेच वाहनचालकांनाही पाठदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे. खड्डे टाळण्यासाठी वाहनचालक उजवीकडच्या मार्गिकेवर वाहने नेत असल्याने पश्चिमेकडून येणाऱ्या मार्गिकेच्या वाहनांची कोंडी होते आहे. त्यामुळे अनेकदा वाहनचालकांत खटकेही उडताना दिसतात.
येत्या १० दिवसात गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. त्याची तयारी सुरू आहे. अनेक गणेश मंडळे गणपती मूर्ती मंडपात नेण्यासाठी हालचाली करत आहेत. मात्र खड्ड्यांमुळे गणरायाचे आगमनही यातूनच होणार की काय असा प्रश्न गणेशभक्त उपस्थित करत आहेत. अंबरनाथच्या उड्डाणपुलाची डागडुजी अनेकदा केली गेली. मात्र तरीही खड्डे पडत असल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. गणेशोत्सवापूर्वी किमान रस्ते सुरळीत करावेत अशी मागणी दोन्ही शहरातील नागरिकांकडून होते आहे.