बदलापूर : बदलापूर शहराच्या पश्चिमेत बेलवली, मांजर्ली या भागातून थेट हेंद्रेपाडामार्गे रमेशवाडी, उल्हासनदी चौपाटी आणि बदलापूर गावात जाण्यासाठी महत्वाचा असलेला रस्ता एका चिंचोळ्या भागामुळे वर्षानुवर्षे डोकेदुखी ठरत होता. मात्र कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांच्या पुढाकाराने अखेर हा चिंचोळा मार्ग मोठा होणार आहे. स्थानिक जमीन मालकांशी यशस्वी संवाद साधल्यानंतर मंगळवारी सायंकाळी या मार्गातील अडथळ्याच्या संरक्षक भिंती तोडण्यात आल्या. बुधवारपासून या मार्गाचे काम सुरू करण्यात येते आहे. त्यामुळे स्थानक परिसरातील कोंडी टाळून थेट समांतर रस्त्याने बदलापूर पश्चिमेत प्रवास करता येणार आहे.
बदलापूर शहराच्या पश्चिम भागातून बदलापूर गाव, रमेशवाडी, हेंद्रेपाडा, अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात जाण्यासाठी एकतर वडवली मार्गे वालिवली, एरंजाड असा प्रवास करत सोनिवलीमार्गे जावे लागते. अन्यथा बेलवली, मांजर्लीतून हेंद्रेपाडा मार्गे किंवा रेल्वे स्थानकाशेजारून जावे लागते. स्थानकाशेजारचा मार्ग कायम गर्दीचा असल्याने येथून जाणाऱ्या वाहनचालकांना कायम कोडींंत अडकावे लागते. त्यामुळे वाहनचालक मांजर्लीतून गणेश चौक मार्गे, म्हात्रे चौक, हेंद्रेपाडा येथून जात असतात. या मार्गाला स्थानकाला समांतर रस्ता म्हणून विकसीत केले जात होते. या मार्गातील सर्वच भागात जवळपास दोन पदरी कॉंक्रिटीकरण करण्यात आले. मात्र मांजर्लीच्या पुढे नाल्यापूर्वी एका ठिकाणी हा रस्ता चिंचोळा होत होता.
स्थानिकांच्या या जागा होत्या. त्यावर तोडगा निघत नसल्याने स्थानिकांना आपापल्या जागेत संरक्षक भिंती बांधल्या होत्या. त्यामुळे हा रस्ता अगदी चिंचोळा झाला होता. मांजर्लीतून निघणारे वाहन दोनपदरी रस्त्याने इथपर्यत येत होते. मात्र येथे एकावेळी एकच वाहन जाईल इतका जागा होती. परिणामी येथे मोठ्या प्रमाणावर कोंडी होत होती. शहरातील अनेक लोकप्रतिनिधी या चिंचोळ्या मार्गात अडकत होते. मात्र स्थानिक जमिन मालकांशी संवाद साधून यशस्वी तोडगा काढण्यात त्यांना यश येत नव्हते. परिणामी नागरिकांना याच कोडीतून प्रवास करत जावे लागत होते.
अखेर कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी या जमिन मालकांशी यशस्वी संवाद साधत त्यावर तोडगा काढला आहे. मंगळवारी मारूती गायकवाड यांनी या भागात पाहणी करत रस्त्याच्या आड येणाऱ्या काही भिंती पाडल्या. तसेच जमिन मालकांचे खासगी जागेतील संरक्षक भिंतीही यावेळी पाडण्यात आल्या. त्यामुळे या मार्गाच्या रूंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
या ठिकाणी असलेल्या जमिन मालकांशी संवाद साधून त्यांना भविष्यात बांधकाम करताना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी सहकार्य करू. त्यांना जागेच्या मोबदल्यात हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) देऊ, असे आश्वासन दिले असल्याची माहिती मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी दिली आहे.